शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (15:29 IST)

ठाकरे सरकारकडून कुलगुरूंना बाबू बनवण्याचा डाव

मुंबईः न्यासा आणि जीएसारखं त्या ठिकाणी कोणी तरी येणार आणि आमची विद्यापीठं डिग्री वाटणारा अड्डा होणार आहे. कुलगुरूंना बाबू बनवण्याचं काम या विधेयकानं केलंय. कुलगुरूंना बस म्हटलं की बसायचंय आणि उठं म्हटलं की उठायचंय अशी अवस्था कुलगुरुंची केलीय. सगळे अधिकार राज्य सरकारनं आपल्याकडे घेतले, अशा भाषेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय
 
भाजप युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पार पडली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. सर्व विद्यापीठांच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेतही प्र-कुलपती या नात्याने राज्य सरकारच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप असेल, अशी सुधारणा ठाकरे सरकारने विद्यापीठ कायद्यात केलीत. यावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारला खडे बोल सुनावलेत. जनतेनं भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवलाय. ७० टक्के उमेदवार हे आपले निवडून आलेले आहेत. कारण जनतेचा विश्वास आपल्यावर आहे. हे ४० आणि ४२ टक्क्यांचे विद्यार्थी निवडून आलेले आहेत. तीन नापास विद्यार्थी एकत्रित आलेत आणि हे रोज सांगतात की जनतेनं आम्हाला निवडून दिलं. जनतेनं तुम्हाला घरी बसवलं होतं. जनतेशी विश्वासघात करून तुम्ही या ठिकाणी सत्तेवर आलात. आलात तर ठीक पण जनतेच्या हिताचं काम करा. शेतकऱ्याला एका नव्या पैशाची मदत आज मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर संकटं आली. त्याला इन्शुरन्सचा पैसा नाही. त्याला मदतीचा पैसा नाही, एवढं काय केंद्र सरकारनं ८ हजार कोटी रुपये या राज्याला दिले. तेही पैसे हे सरकार वाटू शकले नाही. इतकं नतद्रष्ट सरकार या राज्यामध्ये आपण कधीही बघितलं नव्हतं. आज युवांच्या संदर्भात तर अतिशय भयावह अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्या प्रकारचे परीक्षा घोटाळे बाहेर येतायत. खऱं तर युवा पिढीला बरबाद करण्याचं काम सुरू आहे, असं म्हणत फडणवीसांनी घणाघात केलाय.