सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (10:13 IST)

दे रे दे माय, असं सरकारचं वागणं म्हणजे पोरखेळ – आ. अजित पवार

लोकांच्या मदतीसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रशासन हलवायचं असतं. त्यांना मदतीचा हात द्यायचा असतो. परंतु जनता पाण्यात असून मदतीच्या प्रतिक्षेत असताना भाजपा आणि शिवसेना यात्रा प्रचारात झोकून देतात हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी परभणी येथील पत्रकार परिषदेत केली.
 
काही लोक चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, म्हणून भाजपात प्रवेश करत असतील. विरोधी पक्षांमधून आऊटगोईंग सुरु आहे. मात्र, आता त्याच लोकांचे फोन आम्हाला येत असून आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कोण कुणाचे आहेत हे कळेल, असे पवार म्हणाले.शिक्षण मंत्री विनोद तावडे  यांच्यावरसुदधा अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, 'दे रे दे माय' ही भीक मागणं योग्य नाही. मदत लोकं दिलदारपणे करतात. यासाठी भीक मागण्याची गरज नव्हती असा टोला अजित पवार यांनी विनोद तावडे यांना लगावला.
 
शिवस्वराज्ययात्रा रयतेच्या राज्यासाठी आहे तर दुसऱ्यांच्या यात्रा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी आहेत, असा आरोप खासदार डॉ.अमोल कोल्हे  यांनी केला. पीक विमा कंपन्यांना फायदा मिळण्यासाठी सरकारचे धोरण आहे. पीक विम्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला असल्याचे कोल्हे म्हणाले. तसेच आज मराठवाडा_दुष्काळात होरपळत आहे. मध्यंतरी सरकारच्यावतीने दुष्काळ शेष गोळा करण्यात आला तर तो का दिला जात नाही, असा सवाल डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
मुख्यमंत्री मतांच्या राजकारणासाठी महाजनादेश यात्रा काढत आहेत. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.हिच अस्वस्थता शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे, असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.