मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (09:04 IST)

वृद्ध आई-वडिलांना वाऱ्यावर सोडाल तर गुन्हा दाखल करण्याचा पोलीस आयुक्तांचा इशारा

नाशिकमध्ये वृद्ध आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांवर आता फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिला आहे. पालक व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम तरतुदीनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वयोवृद्धांची हेळसांड होणार नाही. त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांना त्यांच्या नातेवाइकांकडून सन्मान मिळावा यासाठी पोलिस आयुक्तांनी अशा पाल्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
 
पोलिस आयुक्तांनी नुकताच गुन्हेगार सुधार मेळावा हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या मेळाव्यात २५० गुन्हेगारांनी सुधारण्याचा संकल्प केला आहे. यातील सुधारण्याचे हमीपत्र दिलेल्या ७ गुन्हेगारांना नोकरीदेखील देण्यात आली आहे. या उपक्रमाची दखल पोलिस महासंचालकांनी घेतली आहे. राज्यात हा दीपक पांडेय पॅटर्न राबवला जाणार आहे.
 
पोलिस आयुक्तांच्या या सकारात्मक उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.अशा प्रकारे उंटवाडी येथील स्मशानभूमीत एक ८१ वर्षीय वृद्ध सरणावर लाकडे रचण्याचे काम करून त्यातून येणाऱ्या पैशांतून आपले चरितार्थ चालवत असल्याची बाब आयुक्त पांडेय यांच्या निदर्शनास आली होती.याची दखल घेत तत्काळ जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना पत्र देत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
 
तसेच या प्रकरणात चौकशीअंती दखलपात्र गुन्हा होत असल्याचे कायद्याच्या तरतुदीनुसार फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याच्या सुचना समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिल्या.या कायद्याप्रमाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पालक व ज्येष्ठ नागरीक यांची हेळसांड होत असल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी त्यांचे मुले,नातेवाई घेत नसल्यास अथवा मुलांनी अशा वृद्धांना वाऱ्यावर सोडले असल्यास त्याबाबत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देत माहिती देण्याचे आदेश दिले आहे. अशा प्रकरणात संबंधित मुले व नातेवाईकांच्या विरोधात आता फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.