शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (22:15 IST)

वादग्रस्त छिंदम बंधू वर्षभरासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांच्या विरुद्ध नगर शहरात संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून दुखापत करणे, गंभीर दुखापत रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरात दहशत निर्माण श्रीपाद शंकर छिंदम व सदस्य श्रीकांत शंकर छिंदम यांना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातून १ वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
 
कोण आहेत छिंदम
छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचा VIDEO काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ व्हायरल त्यानंतर प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.

का वादग्रस्त ठरले होते छिंदम?
छिंदम भाजपचे उपमहापौर होते. बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना शिवजयंतीविषयी अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. त्या कर्मचाऱ्याने याबाबत युनियनकडे तक्रारही केली होती. त्यानंतर छिंदम यांच्या कार्यालयावर शिवसेनेने तुफान दगडफेक केली आणि त्यांच्या कार्यालयाची मोडतोडही केली होती. शिवसेनेसोबतच संभाजी ब्रिगेडही छिंदम यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली. यामुळे छिंदम यांची तात्काळ उममहापौरपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. छिंदम यांनी त्याबद्दल माफिही मागितली होती.