शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (21:44 IST)

मास्कची सक्ती नाही पण मास्क घालण्याचं आरोग्यमंत्र्यांकडून आवाहन

rajesh rope
मास्कची सक्ती करण्यात आली नसली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी मास्क घालावा असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.
 
टोपे म्हणाले, "कोव्हिडच्या बाबतीत आज कॅबिनेटमध्ये प्रेझेंटेशन देण्यात आलं. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट वाढत चालला आहे. या जिल्ह्यात अधिक प्रमाणात मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या जिल्ह्यात अधिक टेस्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
सर्वांनी आता मास्क घातला पाहिजे. जरी मास्क अनिवार्य केलेला नसला तरी तो घातलाच पाहिजे".
 
यंदा वारी होणार का यासंदर्भात ते म्हणाले, "वारीची तयारी खूप पुढे गेलेली आहे. त्यामागे लोकांच्या भावना आहेत. त्यामुळे तूर्तास तरी वारीवर कोणतीही बंधनं घातलेली नाही. पण पूर्ण काळजी घेऊन ही वारी आपण केली पाहिजे".
 
तूर्तास निर्बंधांचा विषय करायचा नाही असं ठरलेलं आहे. पण बुस्टर डोस हा घेतला पाहिजे हे आवाहन आम्ही जनतेला करतो आहोत असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बंदिस्त आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
 
शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच मुंबईसह राज्यभरात रुग्णसंख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाल्याने शाळांबाबत आता काय निर्णय घेतला जाईल याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष लागलंय.
 
कोरोना आरोग्य संकटात गेल्या दोन वर्षांनंतर शाळांचं शैक्षणिक वर्ष पुन्हा एकदा सुरळीत सुरू होत आहे. पण अशातच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो का? शाळांसाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील का? विद्यार्थी आणि पालकांनी काय काळजी घ्यावी? अशा सगळ्या मुद्यांचा आढावा आपण घेणार आहोत.
 
राज्यात रुग्णसंख्येत 10 टक्क्यांनी वाढ
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी राज्यात 1494 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
 
मुंबईत एका दिवसात 961 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 4 हजार 880 सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 767 आहे.
 
महत्त्वाचं म्हणजे मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्यांवर पोहचला आहे. तर रुग्णसंख्येत 8 टक्क्यांनी वाढ झालीय.
 
दरम्यान, देशभरातही कोरोना रुग्णसंख्या 25 हजारांहून वाढली आहे. सध्या देशात 25 हजार 782 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र आणि केरळात आहेत.
 
केंद्र सरकारनही यासंदर्भात पाच राज्यांना पत्र पाठवली आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि पुणे या पाच जिल्ह्यांत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असताना अचानक कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने चौथी लाट येण्याची शक्यता आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो.
 
महाराष्ट्रात राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या निमित्ताने 2 एप्रिल 2022 या दिवशी सर्व निर्बंध उठवले. मास्क वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं असलं तरी मास्क सक्तीबाबत मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
दरम्यान, राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झालीय. तसंच अभिनेत्री कटरिना कैफ, अभिनेता कार्तिक आर्यन, शाहरूख खान कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
 
शिक्षणमंत्री काय म्हणाल्या?
राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात नवीन शालेय शैक्षणिक वर्ष सुरू होते.
 
काही ठिकाणी खासगी शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत तर सरकारी आणि बहुतांश खासगी शाळा 14 आणि 15 जूनपासून सुरू होणार आहेत.
 
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की लगेच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. परंतु शाळांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.
कोव्हिड टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
 
वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, "13 जूनला इयत्ता पहिलीसाठी 'पहिलं पाऊल' हा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होतील. सध्या मास्क बंधनकारक नाही. येत्या काळात कोव्हिडची परिस्थिती पाहून शाळांसदर्भात निर्णय घेतला जाईल. आज (6 जून 2022) मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानुसार निर्णय घेऊ."
 
शाळांमध्ये मास्क सक्ती?
मुंबईत विबग्योरसारख्या काही शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क सक्ती केल्याचं पालकांनी सांगितलं. शाळेत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे.
 
काही खासगी शाळांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोससाठी मोहीम सुरू केलीय. त्यासाठी मुंबईत कॅम्प लावण्यात आले आहेत.
 
इंडियन एज्यूकेशन सोसायटीच्या (IES) महाराष्ट्रात 64 शाळा आहेत. शाळेचे संस्थाचालक सतीश नायक यांनी सांगितलं की, "आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. सरकारकडून ज्या सूचना येतील त्याचं पालन केलं जाईल. शाळा अजून सुरू झालेल्या नाहीत. पण पुढचे काही दिवस पूर्व तयारी केली जाणार आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा सरकारच्या सूचनांची वाट पाहत आहोत."
 
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पालकांसाठीही डोकेदुखी ठरतेय. शाळा सुरू व्हायला काही दिवस राहिलेले असताना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पालकांसाठी चितेचं कारण बनला आहे.
 
इंडियावाईड पॅरेंट असोसिएशनच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी सांगितलं, "ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शाळा सुरू ठेवाव्या. शाळांनी मास्क सक्ती करू नये. कारण सलग 7-8 तास मास्क घालून वर्गात बसणं मुलांसाठी खूप त्रासदायक होईल. त्यामुळे हायब्रीड पद्धतीने शाळा सुरू ठेवल्या पाहिजे. किंवा पूर्वीप्रमाणे 50-50 टक्क्यांच्या विद्यार्थी क्षमतेने शाळांचं वेळापत्रक असावं."
 
राज्यातील सरकारी आणि अनुदानीत शाळा 13 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यानुसार शाळांमध्ये लगबग सुरू झालीय.
 
महाराष्ट्र मुख्यध्यापक संघटनेचे प्रवक्ते संजय डावरे यांनी सांगितलं, "13 तारखेपासून आम्ही शाळा सुरू करत आहोत. दोन वर्षांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल अशी आम्हाला आशा होती. शिक्षकांमध्येही उत्साह आहे. परंतु आता काही ठिकाणी रुग्ण वाढत असल्याने थोडी खबरदारी घ्यावी लागेल. आम्ही विद्यार्थ्यांना मास्क घालून येण्याचे आवाहन करत आहोत. सरकारने लवकरात लवकर सूचना द्याव्यात जेणेकरून शाळांनाही तयारी करायला वेळ मिळेल."
 
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
यापूर्वी शाळा पुन्हा सुरू करताना राज्य सरकारने खालील SOPs दिल्या होत्या,
 
शिक्षकांचं आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचं लसीकरण पूर्ण झालेलं हवं. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही खबरदारी घ्यावी.

जिल्हाधिकारी स्तरावर कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर गठीत करण्यात आलेल्या समितीने प्रत्येक गावात किंवा शहरात रुग्णसंख्येचा आढावा घ्यावा.

शाळेच्या परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी पालकांनाही गर्दी न करण्याच्या सूचना द्याव्यात.

विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास संबंधित वर्गातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना विलगीकरणात ठेवावे. शाळाही तात्पुरती बंद करावी.

शाळेचं निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी.

कोरोनाग्रस्त विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचीही चाचणी करून घ्यावी.

शाळेत एकाचवेळी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही यासाठी वेळापत्रक त्यानुसार तयार करावे. याबाबत शाळांनी
निर्णय घ्यावा.

पूर्व-प्राथमिक शाळांबाबत गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा आणि संबंधित अहवाल शिक्षण उपसंचालकांना वेळोवेळी द्यावा.
 
डिसेंबर महिन्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असताना केंद्र सरकारनेही राज्यांना सूचना केली होती. ओमिक्रॉन व्हेरिएंट धोकादायक असून सरकारने खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावं अशी सूचना केली होती.
 
राज्यांनी स्थानिक पातळीवर पॉझिटिव्हिटी रेट आणि ओमिक्रॉन रुग्णसंख्या वाढत असल्यास तात्काळ निर्णय घ्यावे. तसंच लोकांची गर्दी होणार नाही हे पहाणं, कंटेनमेंट झोन तातडीने जाहीर करणं, संपर्कातील लोकांना शोधणं अशा प्रक्रिया वेगाने राबवाव्या असंही केंद्र सरकारने म्हटलं होतं.
 
आता राज्य सरकार शाळांसाठी नव्याने काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती?
न थांबणारा खोकला - कधीकधी हा खोकला तासाभरापेक्षा जास्त काळही येऊ शकतो. किंवा 24 तासांत खोकल्याची अशी उबळ तीन वा त्यापेक्षा जास्त वेळा येऊ शकते.
 
ताप - शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त
 
तोंडाची चव, वास येण्याची क्षमता बदलणं - तुमच्या तोंडची चव पूर्णपणे जाते, गोष्टींचा वास येत नाही. किंवा मग या दोन्ही गोष्टी नेहमीपेक्षा वेगळ्या भासू लागतात. वास न येणे, चव न कळणे हीसुद्धा कोरोनाची लक्षणं आहेत.