गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (09:36 IST)

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा

अमळनेर : येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी, २९ जानेवारी रोजी आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही. त्याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
 
अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रताप महाविद्यालयात बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी खान्देश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक निरज अग्रवाल, मराठी वाड्मय मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 
साहित्य संमेलन स्थळावर राज्यसभा सदस्य व्ही. मूरलीधरन यांच्या खासदार निधीतून सुरू असलेल्या स्वच्छतागृह बांधकाम प्रगतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सध्या हे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून साहित्य संमेलन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात संमेलनस्थळाकडे जाणाऱ्या चारही दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण पूर्ण झाली असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
महावितरणच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. स्वच्छता, पाणीपुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक आराखडा, व्हीआयपी पाहुण्यांसाठी साहित्य संमेलन स्थळी पोहचण्याचा पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, हेलिपॅड व्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. प्रत्येकाला नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलन स्थळातील मंडप, संमेलन स्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची, पर्यायी मार्ग व हेलिपॅडच्या कामांची पाहणी केली.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor