1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (16:01 IST)

एकनाथ शिंदे गटानं पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला सुचवले 'हे' पर्याय

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठीचे पर्याय दिले आहेत. त्यानुसार, शिंदे गटानं पुढील पक्षासाठी 3 नावांचा पर्याय सुचवला आहे.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांची शिवसेना
शिवसेना बाळासाहेबांची

शिंदे गटानं चिन्हांसाठी 3 पर्याय सुचवले आहेत. यामध्ये,
त्रिशूळ
उगवता सूर्य
गदा
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितलं की, "ठाकरे गटाला त्रिशूळ आणि उगवता सूर्य घेण्याचा अधिकार नाही. ही निशाणी हिंदुत्वाची आहेत. त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्हांसाठी निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. आता आयोग निर्णय घेईल."
विशेष म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरें गटांची दोन चिन्हं (त्रिशूळ आणि उगवता सूर्य) सारखी आहेत. तर पक्षासाठी सुचवलेलं शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नावसुद्धा सारखंच आहे.
 
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय शनिवारी (08 ऑक्टोबर ) घेतला. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देत तीन नावांचा तसंच चिन्हांपैकी एक मिळावं यासाठी पत्र दिलं.
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नावासाठी खालील तीन पर्याय दिले आहेत.
 
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे)
याबरोबरीने चिन्हासाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन प्रस्ताव देण्यात आले आहेत.
यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "लवकरात लवकर चिन्ह मिळालं तर आम्ही जनतेकडे जाऊन कौल मागू."
 
शिवसेनेनी उगवता सूर्य, मशाल या चिन्हांवर याआधी निवडणुका लढवल्या आहेत. तर त्रिशूळ हे देखील धनुष्यबाणाप्रमाणेच हिंदू देवतांचे आयुध आहे. त्यामुळे ते मागितले असण्याची शक्यता आहे.
 
नवीन चिन्ह हे कदाचित शिवसेनेसाठी क्रांती घडवेल -संजय राऊत
"एखादं चिन्ह गोठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. इंदिरा गांधीदेखील अशाच परिस्थितीला सामोरं गेल्या होत्या. काँग्रेसचं चिन्ह तर तीनवेळा गोठवलं गेलंय, जनता दलाचंही चिन्ह गोठवण्यात आलं होतं. नावात काय आहे? शिवसेना नाव जरी गोठवलं तरी खरी शिवसेना कोणाची?, हे सर्वांना ठाऊक आहे," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
 
ते पुढे म्हणाले, "अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीपूर्वी 'धनुष्यबाण' आणि 'शिवसेना' हे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप आहे."
 
Published By- Priya Dixit