शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (14:57 IST)

शरद पवार, उद्धव ठाकरे, रामदास आठवले येणार एकाच व्यासपीठावर; हे आहे निमित्त

chagan bhujbal
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’
मुंबई – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १.३० वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ गौरव समितीचे समन्वयक खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
 
छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अमृत महोत्सवी सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला, प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ.जावेद अख्तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
 
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सावंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ७५ निवडक छायाचित्र पुस्तिका-फोटो बायोग्राफीचे देखील मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात येणार आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.यामध्ये विशेषतः सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम राज्यभर घेतले जाणार आहे.
 
श्री.छगन भुजबळ गौरव समितीमध्ये समन्वयक खा.प्रफुल्ल पटेल यांचेसह काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील,खा.सुप्रिया सुळे,आ.कपिल पाटील,आ.सचिन अहिर यांचा समावेश आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor