सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (11:53 IST)

पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील- अनिल देसाई

शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टा पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, "जिंकून दाखवणारच."
युवासेनेनंही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत 'ठाकरे!' असं कॅप्शन त्याला दिलं आहे.
 
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!"

"निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला स्वीकारावा लागेल. दोन्ही बाजूंनी चिन्ह मिळवण्याचे प्रयत्न झाले. पण आयोगाचा निर्णय स्वीकारणं आम्हाला बंधनकारक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेऊन आम्ही आमची पुढची रणनीती ठरवणार आहोत," असं शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले.
 
उद्धव ठाकरे निर्णय घेतील- अनिल देसाई
"निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. सोमवारी दोन्ही पक्षांना बोलावून बैठक होईल अशी अपेक्षा होती, पण आयोगाने आधीच दिलेला निर्णय अनपेक्षित होता," असं मत खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केलं आहे.
 
"फ्री सिम्बॉल बाबत उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा होईल आणि मग निर्णय घेऊन आयोगाला ते सादर करू," असंही देसाई म्हणाले.
आज दोन्ही गटाच्या बैठका
निवडणूका आयोगाच्या निकालानंतर पक्षाच्या नावावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार-आमदारांची आज संध्याकाळी सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.
 
निवडणूक आयोगाचा निकाल काय?
शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे चिन्ह निवडणूक आयोगानं 8 ऑक्टोबर रोजी गोठवलं आहे. उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
अंधेरी पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्थात, हा निर्णय केवळ पोटनिवडणुकीपुरता नसून चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत लागू राहील.
 
'शिवसेना' पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
शिवसेना कुणाची या वादाबाबत सुनावणी निवडणूक आयोगात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत कोणताच पक्ष किंवा गट या चिन्हाचा वापर करू शकणार नाही.
 PUblished By- Priya Dixit