सचिन वाझेला बळीचा बकरा बनवल्याचा कुटूंबीयांचा दावा, उच्च न्यायालयात घेतली धाव
सचिन वाझेंच्या कुटूंबीयांकडून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. सचिन वाझे यांचा भाऊ सुधर्म वाझे यांच्याकडून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ने माझ्या भावाला म्हणजे सचिन वाझेला ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळेच सचिनला हायकोर्टात सादर करण्याचे आदेश द्यावेत ही मागणी करणारी हेबियस कॉर्पस याचिका सचिन वाझे यांच्या कुटूंबीयांकडून हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या संपुर्ण प्रकरणात राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी व्यक्तींनी सचिन वाझेला बळीचा बकरा बनवल्याचा दावाही कुटूंबीयांनी केला आहे.
दिवंगत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांना काही राजकीय पक्षातील मोठ्या नेत्यांकडून हाताशी धरण्यात आले. विमला हिरेना यांचा वापर करून सचिन वाझेला राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आला आहे. पुरावे नसतानाही सचिन वाझेंना अॅंटिलिया प्रकरणात गोवले, असा उल्लेख सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म वाझे यांनी याआधीच संपुर्ण प्रकरणात अनिश्चितता असल्याचे बोलून दाखवले होते. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतरही त्यांनी या संपुर्ण प्रकरणात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसारच सोमवारी सचिन वाझे यांच्या कुटूंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांची काही दिवसांपूर्वीच माझी भेट झाली होती. त्या भेटीच्या दरम्यान सचिन वाझे हे अत्यंत चिंताग्रस्त होते, अशी माहिती सुधर्म वाझे यांनी दिली होती. त्यांनी वॉट्स एप मॅसेजमध्ये जो मुद्दा मांडला, तोच मुद्दा त्यांनी कुटूंबीयांशी बोलतानाही सांगितला.