शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (08:36 IST)

यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आई बाबांची कार्यशाळा!

यवतमाळ : पालकांनी मुलांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभं राहायला हवं. मुलांना त्यांच्या आयुष्यात संकटाच्या वेळी भक्कम आधाराची गरज असते. अशावेळी “अरे काळजी कशाला करतोस, मैं हूं ना” म्हणत त्याला भक्कम आत्मविश्वास दिला पाहिजे. पालकांनी त्यांच्या मुलांचे मित्र व्हायला पाहिजे. मुलांना त्यांच्या गरजेच्या वेळी आधारासाठी पालक किंवा शिक्षकांचीच आठवण व्हावी असे पालक, शिक्षक होण्याचा प्रयत्न करण्याचे आग्रही प्रतिपादन डॉ. प्रशांत गावंडे यांनी केलं. ते लाख रायाजी येथे आयोजित ‘आई बाबांची शाळा’ या अभिनव कार्यक्रमात बोलत होते.

जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या पालकांसाठी आयोजित ही जिल्ह्यातील पहिलीच कार्यशाळा होती,येथें यावेळी दिग्रसचे गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्रप्रमुख किरण बारशे, पंकज किन्हेकर, सरपंच सौ. नंदा काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. बबिता हंसराज राठोड, उपाध्यक्ष प्रवीण इंगळे, ग्राम पंचायत सदस्य सौ. वृषाली दिपक बोरोकर, संजय काळे मंचावर उपस्थित होते.
 
लहानपणी मुलांना आधाराची गरज असते. मुलं जसजसे मोठे होते तसतसे पालकांनी मुलांच्या आधाराच्या कुबड्या कमी करायला हव्यात. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय मुलांमध्ये वाढू द्यावी. असं विश्लेषण त्यांनी आपल्या व्याख्यानात केलं. आमीन चौहान, एकनाथ मोगल यांनीही उपस्थित पालकांशी संवाद साधला. यावेळी लाख येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे आई-वडील मोठ्या संख्येत उपस्थित होते. तर तुपटाकळी केंद्रातील प्रत्येक शाळेतून दोन निवडक मुलांचे पालक उपस्थित होते.

आई बाबांच्या शाळेसोबतच यावेळी शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. तसेच तुपटाकळी केंद्रातील विविध शाळेच्या 18 विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांचे संचलन कु. माधवी जाधव, रिया गुघाणे, वैष्णवी गुघाणे या इयता सातवीच्या विद्यार्थीनींने केले. तर आभार शिक्षक राजुसिंग राठोड यांनी मानले. उद्बोधक नाटिका, नृत्य, गीत गायन असा बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रम शालेय मुलांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश देशमुख यांचेसह रजनी मसराम, मंगला देवतळे, स्नेहल बारशे, वृंदा चक्करवार, अर्चना दुर्गे, सुनीता ढोके, विष्णू इंगळे, कय्युम खाँ वहाब खाँ, शेख सोनू शेख अब्दुल यांनी परिश्रम घेतले.
 
फाजील लाड पुरवु नये!
मुलांनी एखादी गोष्ट मागितली, काही हट्ट केला की तो लगेच पुरवू नये. अनेक पालक मात्र उलट वागतात. मुलांनी तोंडातून काढले की त्याच्या हातावर ठेवतात. असे वागणारे पालक मुलांची वाट पाहण्याची सवय काढून घेतात. त्यांच्यामध्ये संयम वाढू देत नाहीत. त्यामुळे आपण मागितलेली प्रत्येक वस्तू पुरवणे हे पालकांचे कर्तव्यच आहे असा समज मुलांमध्ये वाढतो. हा गैरसमज भविष्यात मुलांसाठी अतिशय धोकादायक ठरतो. मागितलेली वस्तू लगेच पुरविल्यामुळे मुलांमध्ये नम्रता, संवाद, वस्तू मागणे, वस्तू देणे, मित्रांच्या मदतीने आपल्या गरजा पूर्ण करणे, इतरांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करणे ही कौशल्य वाढत नाहीत. म्हणून पालकांनी मुलांचे हट्ट पुरवितांना दक्ष राहायला हवं असं डॉ. गावंडे यांनी यावेळी सुचविलं.