गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:14 IST)

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?

govind pansare
"पानसरे हत्येचा खटला अजूनही सुरू झालेला नाही, दोन आरोपी फरार, हत्येतलं शस्त्र आणि वाहन सापडलेलं नाही. अशा वस्तूस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर ही केस उभी आहे. अशा स्थितीत ATSने तपास जोमाने करण्याची आणि तपासातील त्रुटी दूर करण्याची गरज आहे." असं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पानसरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
मेधा या ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा आहेत. गोविंद पानसरे यांच्या आठ वर्षांपूर्वी कोल्हापूर इथे हत्या झाली होती. हत्येसंदर्भातला खटला लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करताना त्यांनी गुन्हेगारांच्या शिक्षेला होणारी दिरंगाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
 
पानसरे यांच्या हत्येला 20 फेब्रुवारी या दिवशी आठ वर्षं पूर्ण होत आहेत. मॉर्निंग वॉकला गेले असताना 16 फेब्रुवारी 2015 ला त्यांच्यावर कोल्हापूरमधील निवासस्थानाजवळ दोन व्यक्तींनी पिस्तुलीतून गोळ्या झाडल्या. त्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचार घेत असताना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचा 20 फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यांचं वय 82 वर्षं होतं. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या.
 
"खटला सुरू होण्यासाठी पानसरे कुटुंबाला अनेक अडथळे पार करावे लागले आहेत. ही हत्या घटनात्मक मूल्यांच्या विरोधातील एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये हिंसा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरात पोहचलेली दिसते. या केसमधील हिंदुत्ववादी संघटनांना शिक्षा होणं गरजेचं आहे."
 
"गौरी लंकेश यांच्या हत्येच्या खटल्यासंदर्भात कर्नाटक सरकारने तत्परता दाखवली तशी इच्छाशक्ती गेल्या आठ वर्षांमध्ये भाजप-सेना वा महाविकास आघाडीच्या सरकारने तपास यंत्रणांवर तबाव आणण्यासाठी दाखवली नाही ही दुर्दैवी बाब आहे," अशी खंतही पानसरे यांनी व्यक्त केली.
 
10 संशयितावर आरोप निश्चित
कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या नेमकी कोणी केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र यावर्षी म्हणजे 9 जानेवारी 2023ला कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात दहा संशयितांवर हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले.
 
पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येण्याच्या दृष्टीने ही आरोप निश्चिती महत्त्वाची मानली गेली.
 
त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) करण्यात येत असलेल्या तपासाला दोन आरोपींनी आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
आरोपींची याचिका फेटाळताना न्यायालयाने यावर्षी 1 फेब्रुवारीला स्पष्ट केलं होतं की, "खटला जलदगतीने चालवण्याची मागणी करण्याचा अधिकार आरोपींना असला तरी तपासाला विरोध करण्याचा अधिकार कोर्टाला नाही."
 
"पानसरे खटल्याची सुनावणी आणि एटीएसचा तपास या दोन्ही गोष्टी सुरू राहणार आहेत. कोर्टात साक्षीदार, आणि पुरावे याविषयीची पुढली प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे," असं विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
 
कोण आहेत ते दहाजण?
या 10 संशयितांमध्ये समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अमोल काळे, सचिन आंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, शरद कळसकर, भरत कुरणे यांचा समावेश आहे. यांच्यापैकी काही जण डॉ नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणात देखील आरोपी आहेत.
 
हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, कट रचणे अशा गंभीर गुन्हाच्या भारतीय दंड संहिता कलमासंह शस्त्र कलमांनुसार संशयितांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
 
समीर गायकवाड
सांगलीच्या समीर गायकवाडला SIT ने पानसरेंच्या हत्येनंतर सप्टेंबर 2015 ला अटक केली होती. समीर हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. SIT ने समीर गायकवाड विरोधात पानसरे हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलं.
 
कोल्हापूर कोर्टाने समीर गायकवाडला नंतर जामीन मंजूर केला. याविरोधात पोलिसांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
 
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे
साल 2016 मध्ये SIT ने पानसरे खून प्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती. SIT ने डॉ. तावडे पानसरे हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती दोषारोपपत्रात दिली होती.
 
डॉ. तावडेला या प्रकरणी जामीन मिळाला. याविरोधात पोलिसांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. तावडेचा जामीन फेटाळण्यात आला.
 
अमित दिगवेकर अमित दिगवेकरला जानेवारी 2019 मध्ये SIT ने अटक केली होती. त्याच्यावर गोविंद पानसरे यांच्या घराची रेकी करण्याचा आरोप आहे.
 
अमोल काळे साल 2018 मध्ये पानसरे प्रकरणातील आरोपी अमोल काळेच्या पोलीस कोठडीची मागणी करताना तपास अधिकारी रिमांड अॅप्लिकेशनमध्ये लिहितात, "डॉ. पानसरे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात दोन गावठी बनावटीच्या पिस्तूल वापरण्यात आला. त्यापैकी एकाचा वापर डॉ. दाभोलकर तर दुसऱ्या वापर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या गुन्ह्यात करण्यात आला."
 
कर्नाटकमधील विचारवंत गौरी लंकेश हत्याप्रकरणी अमोल काळेला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर SIT ने पानसरे प्रकरणी काळेला अटक केली.
 
वासुदेव सुर्यवंशी, भारत कुरणे
वासुदेव सुर्यवंशी आणि भारत कुरणेला बंगळुरू पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केली होती. साल 2018 मध्ये महाराष्ट्र SIT ने या दोन्ही आरोपींना गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केली.
 
पानसरेंच्या हत्येचा कट रचण्यात दोघांचा समावेश होता, असा दावा तपास पथकाने कोर्टात केला होता. या प्रकरणी कोल्हापूर कोर्टाने भरत कुरणेचा जामीन अर्ज 2020 मध्ये फेटाळला होता.
 
कुरणेच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी पोलिसांनी दावा केला होता की, डॉ. तावडेने पानसरेंच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दोन बंदूक कुरणेकडे नष्ट करण्यासाठी दिल्या होत्या.
 
सचिन अंदुरे
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात CBI ने अटक केलेल्या सचिन अंदुरेला 2019 मध्ये गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक करण्यात आली. कोर्टाने या प्रकरणातून मुक्त करण्याची सचिन अंदुरेची याचिका मात्र कोर्टाने फेटाळून लावली.
 
कोर्टाने त्याचा जामीन अर्ज 2020 मध्ये फेटाळला होता. सरकारी पक्षाचा दावा आहे की, अंदुरे पानसरेंच्या हत्येच्या वेळी तिथे उपस्थित होता.
 
अमित बद्दी, गणेश मिस्किन
अमित आणि गणेशला महाराष्ट्र ATS ने 2018 मध्ये नालासोपारा शस्त्र जप्ती प्रकरणात अटक केली होती. या दोघांच्या विरोधात ATS ने दोषारोपपत्र दाखल केलं होतं. कर्नाटक पोलिसांनी 2017 च्या विचारवंत गौरी लंकेश खून प्रकरणी देखील या दोघांना अटक केली होती.
 
शरद कळसकर
2019 मध्ये SIT ने पानसरे हत्या प्रकरणी डॉ. दाभोलकर खून प्रकरणातील आरोपी शरद कळसकर अटक केलीये. बेळगावमध्ये गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी ज्या मीटिंग झाल्या त्यात कळसकर उपस्थित होता असा त्याच्यावर आरोप आहे.
 
पानसरे प्रकरणातील फरार आरोपी
गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं.
 
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर कोर्टात पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी झाली होती.
 
बीबीसीशी बोलताना आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, "कॉ. पानसरेंची हत्या कोणी केली? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे."
 
याचं कारण तपास यंत्रणेने पहिल्यांदा समीर गायकवाड आणि त्यानंतर विनय पवार, अकोलकरने गोळी झाडल्याचा दावा केला. त्यामुळे ही हत्या नेमकी कोणी केली. या प्रश्नाचं उत्तर तपासयंत्रणा अजूनही ठोस देऊ शकलेल्या नाहीत.
 
तपास ATS कडे
पानसरे हत्येचा तपास एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक करत आहे.
 
तपास महाराष्ट्र CID च्या विशेष तपास पथकाकडून (SIT) काढून, ATS ला देण्यात यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी 3 ऑगस्ट 2022ला मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. ती मागणी मान्य करत 'हल्लेखोरांचा शोध घेण्यात एसआयटी अपयशी ठरली' अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली होती.
 
तसंच या प्रकरणातल्या काही तपास अधिकाऱ्यांची एटीएसमध्ये बदली करण्याचे आणि विशेष पथक नेमण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले होते.
 
या याचिकेवर सुनावणी करताना, बॉम्बे हायकोर्टाने गोविंद पानसरे हत्याप्रकरणी 2020 पासून तपासात काय निष्पन्न झालं याचा रिपोर्ट देण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले होते.
 
त्यावेळी पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी या तपासाबाबत दोन प्रश्न उपस्थित केले होते.
 
पहिला प्रश्न हा की, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, प्रा. कलबुर्गी ही प्रकरणं एकमेकांशी संबंधित आहेत. यातील आरोपी समान आहेत. आरोपांच्या टार्गेटवर 40 लोक होते. हत्येचा मास्टरमाईंड कोण आहे याचा छडा अद्याप तपास यंत्रणा का लावू शकल्या नाहीत.
 
तर दुसरा प्रश्न असा आहे, डॉ. दाभोलकर प्रकरणातील आरोपी पानसरे हत्या प्रकरणात साक्षीदार म्हणून दाखवण्यात आले. आम्ही आवाज उठवल्यानंतर त्यांना पोलिसांनी आरोपी केलं. तपासात या त्रुटी कशा राहिल्या, असं नेवगी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
 
महाराष्ट्र ATS ची नालासोपाऱ्यातील कारवाई
2018 मध्ये महाराष्ट्र ATS ने मुंबई जवळच्या नालासोपारा भागात काही शस्त्र जप्तीची कारवाई केली होती. यात शरद कळसकरच्या घरातून बॉम्ब बनवण्याची कृती असलेल्या दोन चिठ्या जप्त करण्यात आल्या होत्या.
 
यानंतर एटीएसने वैभव राऊत, सुवन्धा गौंधळेकर, श्रीकांत पांगरकर, अविनाश पवार, लिलाधर, वासुदेव सुर्यवंशी, सुचित रंगास्वामी, भरत कुर्णे, अमोल काळे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किनला अटक केली होती.
 
तेव्हा एटीएस अधिकाऱ्यांनी आरोपपत्रात लिहिलं होतं की, "हिंदू धर्म, रुढी, परंपरा यावर टीका करणारे सहित्यिक आणि सामाजिक व्यक्ती यांना लक्ष करून त्यांची रेकी करून त्यांच्यावर हल्ला करण्याचं नियोजन केल्याबद्दल पुरावा प्राप्त झाला आहे."
Published By -Smita Joshi