मान्सून राज्यात ६ जूनला येणार
मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठय़ावर आला आहे. आता तो ६ जूनलाच येईल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.मान्सूनची कूच ईशान्य हिंदुस्थानात सुरू असून रविवारी तो त्रिपुरा, नागालँड, मिझोराम, मणिपूर ,आसाम आणि अरुणाचल प्रदेशाच्या बहुतांश भागात दाखल झाला.
मान्सूनने केरळमध्ये दोन दिवस आधीच धडक दिली. आता तो गोव्यात सक्रिय होत आहे. तो सध्या कारवारमध्येच रेंगाळला असला तरी केरळमधील त्याचा वेग पाहता तो येत्या ४८ तासांत सिंधुदुर्गात दाखल होईल, असे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. गेले दोन दिवस मुंबई, कोकणसह राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या धारानृत्याने चांगलाच फेर धरला होता. येत्या २४ तासांत मुंबईत असाच पाऊस कोसळेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.