सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (16:58 IST)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता चालविणार

 Mumbai serial blast case
२०११साली झालेल्या तीन शक्तीशाली बॉम्बस्फोटमध्ये २७ लोक मृत्युमुखी व १२७ जखमी झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटचा तपास दहशतवादी विरोधी पथक, मुंबईकडे सोपविण्यात आला होता. यामध्ये पथकाने ११ संशयित आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. हा खटला चालविण्यासाठी नाशिकचे सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांची शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
मुंबईत १३ जुलै २०११ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये ऑपेरा हाऊस येथे १५ लोक, झवेरी बाजारमध्ये ११ आणि दादरच्या कबुतर खान्यात १ असे २७ लोक मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तपास करत हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे इंडियन मुजाहिदिन संघटनेचा हात असल्याचे तपासात निष्पन्न केले होते. पोलिसांनी अकरा आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. संशयित आरोपींनी बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या वाहनांचा तपशील, बॉम्ब बनविण्यासाठी केलेली कार्यवाही, कटकारस्थान, सिमकार्ड, हवालातून आलेली रक्कम, सीसीटीव्ही फुटेज, इंडियन मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेची कार्यप्रणाली आदींचा सखोल तपास करण्यात आला. या सर्व आरोपींना वेगवेगळ्या तुरूंगात ठेवण्यात आले आहेत.
 
दहशतवादविरोधी पथकाकडून शिफारस
मुंबई दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या शिफारसीवरून शनिवारी (दि.९) काढण्यात अलेल्या अधिसूचनेनुसार ॲड. अजय मिसर यांची या खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वीही मिसर यांनी छोटा राजनशी संबंधित पाकमोडीया स्ट्रीट फायरिंग खटला, २००८साली मालेगाव बॉम्बस्फोट खटला, २६/११च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अबु जुंदाल खटला, तसेच लष्कर-ए-तोयबाचा आरोपी बिलाल शेख, हिमायत बेग यांनी पोलिस अकदमी नाशिकची केलेली रेकी आदी खटल्यांचे कामकाज चालविले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor