1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (07:49 IST)

भुजबळ यांच्या पोटात अन् ओठात काय हे समाज जाणून आहे

छगन भुजबळ मुंबईचे महापौर असल्यापासून त्यांना अण्णासाहेब पाटील आणि त्यांची चळवळ माहित आहे. माथाडीच्या मेळाव्याला ते आलेले आहेत. मात्र मराठा समाजाला प्रत्यक्षात त्यांनी किती न्याय दिला? त्यामुळे आंदोलनाच्या व्यासपीठावर ते कितीही मिठूमिठू बोलले तरी, त्यांच्या पोटात अन् ओठात काय हे समाज जाणून आहे, अशा शब्दात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
 
नाशिक येथे मराठा मुक आंदोलनासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बापट आयोगाच्यावेळी ज्यावेळेला शेवटचे दोन नवीन सदस्य आले, त्यावेळी छगन भुजबळ यांची काय भूमिका होती, हे मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांना माहित असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. ९ सप्टेंबरपासून आजपर्यंत राज्य सरकारसोबत जितक्या बैठका झाल्या, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना गाजर दाखवित असल्याचे स्पष्ट होते. 
 
सरकारने ९ सप्टेंबर ते ५ मार्चपर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी दिला नाही. सारथीच्या पाचशे कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला नाही. वसतिगृह उभारले नाहीत. त्यामुळे सरकारसोबत होत असलेल्या बैठकांमधून काय निष्पन्न होत आहे, हे मला समजत नाही. मात्र अशातही बैठका व्हायला हव्यात. राज्यकर्त्यांबरोबर संवाद सुरू ठेवायला हवा, असे ते म्हणाले.