महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारमधील एक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची आज २५ हजार करोडची मालमत्ता आहे, एका काळात भाजी विकत असलेल्या भुजबळांनी २५ वर्षात २५ हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली? असा सवाल नाशिक जिल्ह्यातील शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांच्या या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात नावाचं वाद सुरु झाला आहे. सत्तेत आल्यावर शेकडो पटींनी संपत्तीत वाढ होणारे छगन भुजबळ हे काही एकटेच राजकारणी आहेत असे नाही. बहुतेक सर्वच राजकारणी सत्तेत येताच करोडोची संपत्ती कमावतात्त आणि गर्भश्रीमंत बनतात, त्यांच्या या आर्थिक प्रगतीचे रहस्य सर्वसामान्य माणसाला पटकन लक्षात येत नसले, तरी आज ही संपत्ती वाढते कशी येऊ उघड गुपित आहे.
सुहास कांदे यांनी २५ वर्षात भुजबळांची संपत्ती २५ हजार कोटींनी वाढली असा दावा केला आहे, मुळात भुजबळांना २५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळाला आहे. भुजबळ राज्याच्या मंत्रिमंडळात १९९३ साली मंत्री झाले, त्याआधी ते आमदार होतेच, त्याही आधी ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते, काही काळ ते मुंबईचे महापौरही होते. त्याआधी मात्र ते मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भाजीविक्रीचा व्यवसाय करत होते. मुंबई महापालिकेत जो दरवर्षी अर्थसंकल्प बनतो तो देशातील अनेक छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा कितीतरी मोठा असतो. तिथे अनेक कंत्राटे देण्याचे अधिकार महापौरांना असतात, मुंबई महापालिका हे सत्ताधारी राजकारण्यांचे चराऊ कुरण असल्याचे बोलले जाते. हे बघता महापौरपदाच्या काळात एखाद्या व्यक्तीची वरकमाई काय असेल? याचा अंदाज बांधता येतो, अर्थात हा चोरीचा मामला असल्यामुळे कुणीही मोठ्याने ओरडत नाही. 'तेरी भी चूप मेरी भी चूप या न्यायाने सर्वकाही व्यवहार चालू असतात.
या संदर्भात आज सकाळीच एका युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ ऐकण्यात आला, त्यात शिवसेनेच्या संस्थापक ठाकरे फॅमिलीच्या कमाईचाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेच्या स्थापनेआधी बाळासाहेब ठाकरे मार्मिक हे साप्ताहिक चालवत होते, त्यातून मुंबईतील वांद्र्यासारख्या कलानगर भागातील पॉश एरियात ५ माजली इमारत कशी उभी राव शकते? हा प्रश्न सदर विश्लेषकाने त्या व्हिडिओत उपस्थित केला होता. आता खरेखोटे काय ते परमेश्वरालाच ठाऊक.
एकूणच स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण्यांचा आढावा घेतला तर क्षुल्लक धंदा करणारे राजकारणात येऊन नेते झाले की, त्यांची संपत्ती चक्रवाढ पद्धतीने वाढलेली दिसून येते, नागपुरात ७० च्या दशकात एका नेत्याने लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यावेळी हा नेता करोडोची संपत्ती बाळगून होता मात्र या निवडणुकीच्या २५ वर्ष आधी या व्यक्तीचे नागपूर शहरात रस्त्याच्या काठाला बसून सायकलचे पंक्चर बनवण्याचे दुकान होते, अशी चर्चा सुरु होती. त्याच्या या चक्रवाढ प्रगतीवर टीका करणारे नारेही निवडणूक प्रचारात दिले जात होते. आज हा नेता हयात नाही मात्र नागपुरात ठिकठिकाणी त्याच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. शिवाजीनगरसारख्या पॉश वस्तीत त्याचा टोलेजंग बांगला आहे.
सर्वसामान्य माणूस शिक्षण आटोपतो आणि नोकरी धंद्याला लागतो, घरसंसार चालवून त्याला स्वतःच्या राहण्यासाठी दोन खोल्यांचा ब्लॉक जरी घ्यायचा तरी कर्ज घेऊन आयुष्यभर हफ्ते भरावे लागतात, सायकलवर फिरता फिरता स्कुटर घ्यायची इच्छा झाली तर शक्यतोवर सेकंडहँड स्कुटर घेण्याचा तो विचार करतो तिचे पैसेही तो हफ्तेवारीने भरतो, ही सर्वसामान्य माणसाची अवस्था झाली, मात्र राजकारणी व्यक्ती ५-१० वर्षातच अरबोपती कसे होतात? हा खरा अभ्यासाचा विषय आहे.
याला कारण आहे, ती आपली भ्रष्ट प्रशासन व्यवस्था. आजच्या प्रशासन व्यवस्थेत सामान्य माणूस कोणत्याही कामासाठी गेला, तरी त्याला सरकारी काम अन वर्षभर थांब या म्हणीचा अनुभव येतो, कोणतेही काम फाईलवर वजन ठेवल्याशिवाय होत नाही, असा अनुभव सर्वसामान्यांना येतो. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, असा दावा केला जातो, यातील कायद्याचे या शब्दाची फोड काय "द्याचे" अश्या प्रकारे जाणकार मंडळी करतात. काहीतरी दिले की तुमचे काम कायद्याच्या चौकटीत बसवले जाते, अन्यथा ते बेकादेशीर ठरवले जाते. हा सर्वसामान्य माणसाला दररोज येत असलेला अनुभव आहे. इथेच राजकीय व्यक्तींचे काम सुरु होते, अड्वलेली फाईल काढून घेण्यासाठी मग लोकप्रतिनिधींची भेट घेतली जाते, लोकप्रतिनिधींचा योग्य तो मानपान केला की ते संबंधित अधिकाऱ्याला फोन करतात अनेकदा या अधिकाऱ्याचा कसा मानपान करायचा याचीही सूचना लोकप्रतिनिधी देत असतात, मग अधिकाऱ्याकडे लिफाफा पोहचतो आणि फाईल क्लियर होते. आलेल्या लिफाफ्यातला ठराविक हिस्सा लोकप्रतिनिधींकडे पोहचत असतो.
अनेकदा अश्यजागी पोस्टिंग मिळण्यासाठी अधिकारी लोकप्रतिनिधींना बिदागी देत असतात, सुमारे २० वर्षांपूर्वी मंत्रालयात एका मंत्री मित्राशी बोलत होतो, त्याच्याकडे एका आमदाराने संदर्भित केलेली बदलीची फाईल आली होती, ज्या अधिकाऱ्याची बदली करायची तो वादग्रस्त म्हणून गाजला होता, त्याबाबतीत मी सहजच संबंधित मंत्र्याला बोललो, त्यावेळी मंत्र्याने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे होते. अविनाश या आमदाराने मला स्पष्ट सांगितले की आम्ही अधिकाऱ्यांकडून बदल्यांचे पैसे घेतो आणि हा पैसे कार्यकर्त्यांना सांभाळायला आम्ही वापरतो, तुम्ही ही बदली करत नसाल तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन करून घेऊ, अशी धमकीही संबंधित आमदाराने संबंधित मंत्र्याला दिली होती, यावरून भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे दिसून येते. गेल्या मार्चमध्ये राज्यातील गृहमंत्र्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई शहरातून दरमहा १०० कोटी वसूल करून आणून द्यायला सांगितले होते, असा आरोप करण्यात आला. सध्या या मंत्र्याची ईडी चौकशी चालू असून सदर मंत्री भूमिगत झाला आहे, यावरून भ्रष्टाचाराने किती आक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे, हे लक्षात येते.
आज भ्रष्टाचार हा प्रशासन व्यवस्थेच्या नसानसात भिनला आहे, देशातील राजकारणही भ्रष्टाचाराने लडबडलेले आहे, त्यामुळेच भुजबळांसारख्या नेत्यावर २५ हजार कोटींची कमाई केल्याचा आरोप केला जातो. असे भुजबळ अनेक आहेत, सध्या अनेक मंत्र्यांवर असे आरोप झालेले आहेत. अनेकांची ईडी चौकशीही सुरु आहे, याच भुजबळांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुमारे पावणेदोन वर्ष तुरुंगातही काढावी लागली होती. आताही अजून कुणी जातात का? याची वाट बघणे चालू आहे, एकूणच चिंताजनक परिस्थिती आहे.
गेल्या ७० वर्षात हा भ्रष्टाचार असाच वाढत गेला, मात्र काही दिलासादायक व्यक्तीही दिसून आलेल्या आहेत, भारतीय जनता पक्षाचे काही काळ राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले किशाभाऊ ठाकरे अखेरपर्यंत एका खोलीतच राहिले, आणि मरतेवेळी त्यांच्याजवळ काहीही संपत्ती नव्हती. असाच प्रकार कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड ए. बी. वर्धन, मार्क्सवादी पक्षाचे रामचंद्र घंगारे यांच्याबाबतही होता, अजूनही शोधल्यास अश्या प्रकारची काही उदाहरणे निश्चित सापडतील, मात्र ती बोटावर मोजता येतील इतकीच असतील हे नक्की.
भ्रष्टाचार ही भारतीय राजकारणाला आणि प्रशासन व्यवस्थेला लागलेली फार मोठी कीड आहे, ही कीड संपूर्ण देशाला पोखरत चाललेली आहे, यापासून देशाला वाचवायचे असेल तर हा भ्रष्टाचार संपवायचा कसा? याचा विचार करावा लागेल. राजकारण्यांची संपत्ती चक्रवाढ गतीने कशी वाढते आणि तिला कसा आळा घालता येईल? यावर प्रयत्न करावे लागतील तरच या देशाचे काही भले होऊ शकेल, अन्यथा काही खरे नाही.
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
अविनाश पाठक