पर्यटन क्षेत्रात शासनाच्या बरोबरीने खासगी गुंतवणूक वाढवणार
राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या पर्यटनासाठी ५०० कोटी रुपये आणि पर्यटन खात्याकरीता १ हजार कोटी अधिकची तरतुद केली आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालते. आपल्या देशामध्ये सुद्धा राजस्थान, केरळ, गोवा अशा राज्यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. पर्यटन क्षेत्रात शासनाच्या बरोबरीने खासगी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला पाहिजे. पर्यटन आपला इतिहास, संस्कृती आहे,”असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
“पर्यटन क्षेत्रामध्ये अमर्याद अशी संधी उपलब्ध आहे. जे-जे प्रस्ताव आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे यांनी आणले त्या सगळ्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याचे अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, मी पण बरेच वर्ष समाजकारण, राजकारण कराणारा कार्यकर्ता आहे. १९९१ -९२ ला मला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. या सर्व गोष्टींना तीस वर्षे उलटले आहेत. आमच्या पाठीमागचा इतिहास बघितला तर पर्यटन खाते ज्यांच्याकडे असायचं निधी कमी असायचा पण शेवटच्या मार्च एंडला त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात आणि मतदारसंघातचं सगळे पैसे जायचे. तुम्ही हे तपासून पाहू शकता. आम्हाला हे कळायचचं नाही हे काय चाललं, या पद्धतीच्या घटना घडायच्या,” असे अजित पवार म्हणाले.