रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (07:52 IST)

बहिण – भाऊ म्हणून नातं उरलेलं नाही, राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी

pankaja dhananjay
– भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि आमच्यात आता बहिण – भाऊ म्हणून नातं उरलेलं नाही, राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहिण – भावातील सध्याच्या नात्यावर भाष्य केले आहे. त्यांच्यातील भाऊ – बहिणीचं नातं संपलं असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे.
 
धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा मुंडे आणि आमच्यात पूर्वी नातेसंबंध होते. नात्यातून आमच्यात राजकारणामध्ये वैर निर्माण झाले. त्यामुळे कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे त्याचे काय परिणाम होतात, हे ज्यांनी त्यांनी आत्मपरिक्षण करावे. अशा पद्धतीची वक्तव्ये त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वारंवार येत आाहेत. ती बरोबर की चुकीची आहेत, याचे ज्यांनी त्यांनी आकलन करून त्या पद्धतीने मांडणी करावी, असा सल्लाही त्यांनी या वेळी बोलताना दिला. जनता जर माझ्या पाठीशी असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही माझा पराभव करू शकत नाहीत, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नात्याविषयीची प्रतिक्रिया दिली. याबरोबरच भगवान गडाच्या दसऱ्याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरु केली होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ती परंपरा सुरु ठेवली. आता या मेळाव्याला कोणाला बोलवायचं, केंद्रीय मंत्र्यांना आमंत्रण का दिले जात नाही हे पंकजा मुंडेंना विचारले पाहिजे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
 
दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावामधील राजकीय वाद महाराष्ट्राला नवीन नाही. या दोघांमधून विस्तव जात नाही. संधी मिळेल त्यावेळी हे दोघे एकमेकांवर तोंडसुख घेत असतात. मुळात हे दोघे निवडणुकीच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या फडणवीस सरकारमध्ये त्या ग्रामविकास मंत्री हेात्या, तर धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते.

Edited by : Ratnadeep Ranshoor