शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (08:30 IST)

नाशिक जिल्ह्यातील या गावांचाही गुजरातमध्ये जाण्याचा इशारा

नाशिक –  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्ष उलटूनही सुरगाणा तालुक्यातील अनेक गाव व पाडे सुख सुविधा पासून वंचितच राहिली आहेत. ग्रामीण भागातील गावांचा विकास करता येत नसेल तर ही सर्व गावे गुजरात मध्ये विलिन करा अशी मागणी तहसिलदार सचिन मुळीक यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी केली आहे.
 
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची चर्चा सुरू असतानाच आता सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील गावे गुजरात मध्ये सामील करण्याची मागणी पुढे आली आहे. गुजरात राज्यातील व गुजरातच्या सीमावर्ती भागात आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मिळणाऱ्या सुखसुविधा मध्ये व विकास कामांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. गुजरात मधील सीमावर्ती भागातील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी, दळणवळण, वीजपुरवठा इत्यादी नागरिकांना मिळणाऱ्या सुखसुविधा सुस्थितीत आहेत. तर सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून गेल्या काही वर्षांत २४ पुर्ण वीजपुरवठा मिळालेला नाही. दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे शेती व्यवसायात पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून मजूरीसाठी होणारे स्थलांतर अद्याप थांबलेले नाही. अर्थात जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे होता तो विकास मागील काही वर्षात झाला नाही.
 
राज्याच्या सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थ आपणाकडे खालील नियम,अटी,शर्तीच्या अधिन राहून नम्रपणे मागणी करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली एकीकडे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी जल्लोषात साजरा झाला मात्र सुरगाणा तालुक्यात अजूनही आदिवासी बांधव जीवनावश्यक सोयी सुविधांपासून वंचितच आहेत.छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेले महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांची जननी असलेले राज्य आहे याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. मात्र पंच्याहत्तर वर्षे विकासापासून आम्ही वंचितच आहोत. तो विकासाचा अनुशेष भरून काढावा अन्यथा आमचा समावेश गुजरात राज्यात करावा. अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यानी सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक याच्याकडे निवेदनद्वारे केली असून.
 
सुरगाणा तालुक्यातील काही गावांचा समावेश गुजरात राज्यात करण्यात यावा अशी मागणी खालील मुद्दे विचारात घेऊन करीत असल्याचे म्हटले आहे.
(१) १ मे १९६१ पुर्वी गुजरात राज्यातील वघई, आहवा डांग हा भाग महाराष्ट्र राज्यात होता. डांग सेवा मंडळ नाशिकचे तत्कालीन संचालक कै. दत्तात्रेय मल्हारराव बिडकर दादांनी वघई तालुक्यातील रंभास, आहवा या ठिकाणी मराठी शाळा सुरु केल्या होत्या. त्या शाळा गुजरात सरकारकडे वर्ग करण्यात आल्या.
(२) १मे१९६१ साली तत्कालीन पंतप्रधान दिवंगत मोरारजी देसाई यांनी डांग हा जंगल व्याप्त भाग सापुतारा सह गुजरात राज्यात जोडून सीमावर्ती भाग हा महाराष्ट्रात जोडला. आजही सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सिमेलगतचा भाग हा अतिदुर्गम, अविकसित, मागासलेला, महाराष्ट्र शासनाने दुर्लक्षित केलेला असा असून नागरी मुलभूत सुविधांपासून वंचितच आहे.
 
(३) या भागातील कच्चे रस्ते, उघडी पडलेली खडी व मोठे खड्डे असलेले रस्ते आहेत. त्याउलट सुरगाणा तालुक्याच्या शेजारी असलेल्या गुजरात मधील सीमावर्ती भागातील पक्के रस्ते आहेत. बर्डीपाडा येथून नाशिक जाणेसाठी चार ते पाच तास वेळ लागतो तर सुरत येथे जाण्यासाठी केवळ दोन ते अडीच तास वेळ लागतो. अंतर मात्र दोन्ही शहरांचे सारखेच.
(४) गुजरात राज्यात आरोग्यसेवा तत्पर, अतिजलद गतीने मिळते, रुग्ण वाहिका, रुग्णालयातील सोयी सुविधा खाजगी, सरकारी, सेवाभावी संस्थे मार्फत नाममात्र शुल्कात रुग्णसेवा मिळते. रुग्ण सेवा महाराष्ट्रात जिल्हा रुग्णालयात
मिळणार नाही तीच सेवा अल्प दरात धरमपूर, बलसाड, खारेल, बिलीमोरा, चिखली, सुरत, बडोदा या ठिकाणी मिळते त्यामुळे आरोग्य सेवा बाबतीत सीमावर्ती भागातील सर्वच नागरिक गुजरात राज्यात दाखल होतात. महाराष्ट्रात अजूनही किमान आरोग्य केंद्र,उपकेंद्रे उपलब्ध नाहीत.तालुक्याच्या ठिकाणी अद्याप तरी उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले नाही. ग्रामीण रुग्णालय स्थापन होऊन पन्नास वर्षे झाली तरी वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ हि पदे भरलेली नाहीत ती तत्काळ भरली गेली नाहीत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor