या सरकारने दावोसपेक्षा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व दिले
सरकारला राजकारणात अधिक स्वारस्य आहे. त्यामुळे या सरकारने दावोसपेक्षा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व दिले आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ते म्हणाले, दावोस येथे गुंतवणूकदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला देशातील बहुतांश राज्यातील मुख्यमंत्री जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अधिक महत्त्वाचा वाटतो. आगामी महापालिका निवडणुकीसाठी या दौऱ्याला महत्त्व दिले जात आहे. आपण किती चांगले काम करत आहोत हे पंतप्रधान मोदी यांना दाखवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मात्र जनतेला सर्व कळतं, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान येत असतात व जात असतात. पंतप्रधान मोदी हे स्वभावाने व मनाने चांगले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्याकडे दौऱ्यासाठी पुढील तारीख मागितली असती तर त्यांनी ती दिली असती. तसे करुन मुख्यमंत्री शिंदे हे दावोसला जाऊ शकत होते. मात्र या सरकारला राजकारणात अधिक रस आहे. आगामी निवडणुका जिंकायच्या. शिवसेनेला हरवायचे हाच या सरकारचा अजेंडा आहे. त्यामुळे दावोस बैठकीकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.
शिंदे-आंबेडकर भेट छुपी नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली भेट छुपी नव्हती. सर्वांना कळाले ना ते दोघे भेटले. परवा मी दिल्लीत होतो. तेथे माझी आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाली हेही सर्वांनाच कळालं ना, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे. जम्मू-काश्मिरला या यात्रेची सांगता होणार आहे. काॅंग्रेसचा एक तरुण खासदार राष्ट्रीय एकात्मतेसाठी हजारो किमीचा प्रवास करत आहे. त्याचे कौतुकच करायला हवे. या यात्रेत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले होते. मीही यात्रेत सहभागी होणार आहे. जम्मू-काश्मिरसोबत बाळासाहेबांचे नाते होते. शिवसेनेचेही नाते आहे. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने या यात्रेत सहभागी होण्यासाठी मी २० जानेवारीला जम्मूला जाणार आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor