बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (16:02 IST)

हा तर जोक ऑफ द डे झाला : चित्रा वाघ

मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून विरोधकांवर तोंडसुख घेण्यात आलं. साकीनाका बलात्कार प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेने कथुआ आणि हथरसच्या अशाच घटनांची आठवण विरोधकांना करून दिली आहे. त्यावरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्र वाघ यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “हा तर जोक ऑफ द डे झाला”, अशा खोचक शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
 
“राज्यातल्या महिलांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आणण्याच्या गोष्टी तुम्ही करता. पण तो तर बाजूलाच राहिला. पण या बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय. एफआयआर होत नाहीत त्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतंय. ज्याच्यावर एफआयआर आहेत ते बाहेर उजळ माथ्याने फिरतायत. बलात्कारीच म्हणतायत आम्ही बलात्काऱ्यांना सोडणार नाहीत. हा तर जोक ऑफ द डे झाला. तुम्ही घेत असलेली ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची दखल भाजपा घेणार. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे प्रश्न विचारणार आणि सत्ताधारी म्हणून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी निशाणा साधला.