सुफी धर्मगुरूच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपी गजाआड; सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
अफगाण सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरीफ बाबा (३२) यांच्यावर गोळया झाडणा-या तीन जणांना राहूरी पोलिसांनी गजाआड केले आहे. या तिघांकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूलांसह जीवंत काडतुसे जप्त केले आहे. संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (रा. समतानगर कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (रा.चवडी जळगाव ता. मालेगाव) व विशाल सदानंद पिंगळे (रा. कोपरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे.
राहूरी पोलिसांना अहमदनगर – मनमाड मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या तीघांची माहिती मिळाली. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास हॉटेल सर्जा येथे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात हे तिघेही अडकले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी आर्म अॅक्टनुसार राहूरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अफगाण सुफी धर्मगुरुं जरीफ बाबा (३२) या निर्वासितचा ५ जुलै रोजी रात्री येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. येवला पोलिसांनी संशयितांच्या साथीदारांना पकडले होते. आर्थिक आणि मालमत्तेमधून ही हत्या करण्यात आली होती. पण, या घटनेत मुख्यसंशयीत फरार झाले होते. ते आता राहुरी पोलिसांच्या हातात लागले आहे. या आरोपींना आता लवकरच येवला पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.