शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (21:23 IST)

सुट्टीवर आलेल्या आर्मीतील जवानावर काळाचा घाला

सिन्नर : नवीन ठिकाणी नियुक्ती झाल्यामुळे पत्नी व मुलांना घरी सोडण्यासाठी आठवडाभराची सुट्टी घेऊन गावी आलेल्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील 28 वर्षीय लष्करी जवानाचा गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे परिसरात अपघाती मृत्यू झाला.
 
जितेंद्र संपत आंधळे असे मृत्यू झालेल्या लष्करी जवानाचे नाव आहे. श्री. आंधळे हे 23 मराठा बटालियन मध्ये केरळ राज्यात कार्यरत होते. त्यांची कर्नाटक राज्यात बदली झाल्यामुळे दि. 21 मार्च रोजी ते पत्नी व मुलांना घेऊन गावी आले होते. पाठोपाठ त्यांचे घरातील सामानही गावी आणण्यात येत होते.
 
पत्नी व मुलांची गावी व्यवस्था करून ते आठवडाभराने पुन्हा नवीन नियुक्तीच्या जागी हजर होणार होते. गुरुवारी रात्री पत्नी ज्योती, सात वर्षांचा मुलगा पियुष, तीन वर्षांची मुलगी आरोही यांना घेऊन ते जवळच असलेल्या मानोरी येथे सासरवाडीला गेले होते. त्यांना तेथे सोडून गावातीलच साडू ज्ञानेश्वर उत्तम सांगळे यांना सोबत घेऊन ते कामानिमित्त व नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदूर शिंगोटे येथे गेले होते.
 
तेथून परत येत असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास जवळ समोरून चुकीच्या बाजूने भरधाव आलेल्या कारच्या हेडलाईटने डोळे दिपल्याने श्री. आंधळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकून अपघात झाला. या अपघातात श्री. आंधळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर सांगळे हे देखील जखमी झाले.
 
या घटनेमुळे खंबाळे गावावर शोककळा पसरली आहे. खंबाळे यांच्या पश्चात आई, पत्नी ज्योती, सात वर्षीय मुलगा पियुष, तीन वर्षीय मुलगी आरोही असा परिवार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor