सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (21:09 IST)

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

eknath shinde
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.
 
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.
 
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.


Edited By - Ratnadeep Ranshoor