गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सांगली , बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (21:26 IST)

डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू

death
Two died due to DJ's noise : सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला. दोन तरुणांच्या या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय ३२, रा. कवठेएकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय ३५, रा. दुधारी) या तरुणांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. यामधील शेखर पावशेची १० दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती.
 
दुधारी येथील प्रवीण शिरतोडेचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. सोमवारी रात्री सात वाजता तो कामावरून घरी येत होता. घरी परतत असताना रस्त्यात त्याची दुचाकी बंद पडली. बरेच अंतर दुचाकी ढकलत तो घरी पोहोचला. परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने डबा व गाडी घरी ठेवून तो लगेचच मिरवणुकीत सामील झाला. दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागले. मित्रांसोबत नाचत असतानाच त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
कवठेएकंदमधील शेखर या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या १० दिवसांपूर्वीच त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. ऐन उत्सवाच्या वातावरणात उमद्या शेखरचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.