गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (19:39 IST)

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र, शिवसेना-'वंचित'च्या युतीचे अर्थ काय?

uddhav prakash ambedkar
ANI
“आजपासून म्हणजे बाळासाहेबांच्या जन्मदिनापासून निवडणुकीत बदलाचं राजकारण सुरू होईल. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आम्ही करत आहोत.”
 
अशा शब्दांत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली.
 
प्रबोधनकार डॉट कॉमच्या लोकार्पणावेळी या युतीचे संकेत महाराष्ट्राला मिळाले होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फारसं सख्य नसलेल्या वंचित बहुजन आघाडीसोबत शिवसेना युतीसाठी पुढचं पाऊल उचलेल का, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. अखेर ती शंका मिटलीय.
 
विविध राजकीय अर्थांनी उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचं एकत्रित येणं महत्त्वाची घटना मानली जातेय. त्याचसोबत, ऐतिहासिक संदर्भसुद्धा या युतीला आहेत. ते असे की, उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू, तर प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू.
 
भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून अडीच वर्षे सत्तेत राहिल्यापासून उद्धव ठाकरे सातत्यानं शिवसेनेच्या हिंदुत्वाची नवी व्याख्या स्पष्ट करू पाहतायेत.
 
या व्याख्येला ते सर्वसमावेशक करू पाहतायेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे-आंबेडकर एकत्र येणं महत्त्वाची घटना ठरते.
 
शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे राजकीय अर्थ काय, वंचितची ही युती शिवसेनेशी झाल्यानं महाविकास आघाडीतले इतर दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी कसं जुळवून घेतलं जाईल, या युतीचा नेमका फायदा कुणाला - उद्धव ठाकरे की प्रकाश आंबेडकर?
 
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं राजकीय विश्लेषक, वरिष्ठ पत्रकार आणि अभ्यासकांशी बातचित केली.
 
तत्पूर्वी, युतीच्या घोषणेवेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले, हे जाणून घेऊया. मग विश्लेषणाच्या भागाकडे येऊ.
 
युतीच्या घोषणावेळी ठाकरे-आंबेडकर काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले, “देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढे जाऊ. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. पुढे एकत्रित चालण्यासाठी एकत्र येतोय.”
 
तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे. गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला.”
 
“शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे. पण ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा मी बाळगतो,” असंही आंबेडकर म्हणाले.
 
उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांशी युतीची गरज का भासली?
2019 मध्ये भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि शिवसेना सत्तेत आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सातत्यानं भाजपेतर पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला.
 
2019 मध्ये सत्तेसाठी विधानसभेत बहुमत सिद्ध करत असताना समाजवादी पक्ष, एमआयएम, सीपीएमने मतदान केलं, अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजपेतर बहुतेक पक्षांनी पाठिंबा दिला होता, तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अगदी संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेलाही उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलं. असं करत करत उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचले आहेत.
uddhav thackeray
ANI
राजकीय विश्लेषक आणि निवडणूक तज्ज्ञ अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याशी आम्ही बातचित केली.
 
अभिजित ब्रह्मनाथकर म्हणतात की, “उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांना डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीची रणनिती आखल्याचं या युतीच्या घोषणेचा अर्थ आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, औरंगाबाद, नांदेड, परभणी... हा सारा रेल्वेपट्टा आहे. शिवसेनेच्या भाषेत याला ‘गोल्डन रेल्वे ट्रॅक’ म्हणतात. कारण यावरूनच शिवसेना वाढत गेलीय. या क्षेत्रातील दलित मतं आहेत, आंबेडकरांना मानणारी मतं आहे, त्यांना आपलसं करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पहिलं पाऊल टाकलंय.
 
“उद्धव ठाकरेंना मुस्लीम समाजातही सहानुभूती आहे. त्यांनी मोदींसोबत दोन हात केल्याचं मुस्लीम समाजाचं म्हणणं आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी बाळासाहेबांना मानणारी मतं, दलित मतं आणि मुस्लीम मतं असं गणित केल्यावर मुंबई महापालिकेतली किंवा इतर निवडणुकांमधील सत्ता टिकवली जाऊ शकते, असा यामागे उद्देश दिसतो.”
 
अशा युती-आघाड्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हिंदुत्वाची विचारधारा नव्यानं सांगू पाहतायत का, असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो. यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे म्हणतात की, “एवढा सखोल विचार उद्धव ठाकरेंनी केला असेल, असं दिसत नाही. निवडणुकीच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी, अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही सर्व धडपड दिसून येतेय. विचारधारेच्या पातळीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना फारशी वेगळी दिसेल, असं एवढ्यात निश्चित सांगता येत नाही.”
 
 
‘वंचित’सोबतची युती शिवसेनेला अडचणीची ठरेल का?
वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवली होती. विशेषत: लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीनं इम्तियाज जलील यांच्या रूपात खासदारही संसदेत पाठवला.
 
शिवाय, नांदेडसह अनेक ठिकाणी मोठी मतं मिळवली. याचा फटका त्या त्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही बसला.
 
अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडीसोबत जागावाटप, महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकरांचे संबंध आणि आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकांवरून मतभेद होऊ शकतात का, यावर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्याशी आम्ही बातचित केली.
 
ज्ञानेश महाराव म्हणतात की, “काँग्रेससोबत वंचित गेल्यावेळेसच जाणार होते. मात्र, जाऊ शकली नाहीत. वंचितला सतत भाजपची बी टीम हिणवलं गेलं. परंतु, वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नुकसान झालं, तसं शिवसेनेचंही नुकसान झालं. महाराष्ट्रात कवाडे, आठवले, गवई हे क्षीण झालेले आहेत. अशावेळी आंबेडकरी आणि डावी मतं प्रकाश आंबेडकरांच्या बाजूनं दिसतात. ही मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हवी आहेत. मात्र, त्यांच्या अटीवर हवीत.
 
“आता आंबेडकरी मतं केवळ प्रकाश आंबेडकरांकडेच आहेत असं नाही. काँग्रेस, भाजपसह सर्व पक्षात विखुरलेली आहेत. तरी त्यातूनही आपला मोठा अनुयायी वर्ग प्रकाश आंबेडकरांनी तयार केला आणि त्याचा परिणाम 2019 साली दिसलाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणात महत्त्व आहे.
 
“प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतल्यानं शिवसेनेला महाविकास आघाडीत अडचण येणार नाही आणि यायलाही नको खरंतर. कारण भाजपेतर पक्षांना तगून राहणं, अस्तित्व टिकवणं हे प्राधान्य असेल.”
 
त्याचसोबत, महाराव म्हणतात की, जर उद्धव ठाकरेंपुरता विचार करायचा झाल्यास, प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला दिला गेल्यास, या दोघांना वैचारिक पातळीवरही अडचण येताना दिसत नाही. शिवाय, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात राजकारण करूनही, 2019 ला जुळवून घेतलं. मग प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत जुळवून घ्यायला काय अवघड आहे?”
 
जागावाटपाबाबत मात्र विश्लेषक साशंक दिसतात.
 
राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर म्हणतात की, “प्रकाश आंबेडकरांना सोबत तर घेतलंय, पण मुद्दा असा आहे की, जागावाटप कशी करणार आहात? मुंबई महापालिकेचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास, शिवसेनेचा नगरसेवक असलेली जागा प्रकाश आंबेडकरांनी मागितल्यास उद्धव ठाकरे काय करणार आहेत? त्यामुळे जागा वाटपचा मुद्दा कळीचा ठरणार आहे.”
 
मात्र, ज्ञानेश महाराव म्हणतात की, “ताकदीनुसार जागावाटपाचा तिढा सोडवता येऊ शकतो. तेवढा विचार तर युती करण्याआधी केलाच असेल. इथे फक्त समजुतदारीचा मुद्दा असेल. समजुतदारीने हा तिढा सोडवल्यास अडचणीचा प्रश्न येणार नाही.”
 
तर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संबंधांबाबत मुद्दा मांडतात.
 
राजेंद्र साठे म्हणतात की, “ज्या अर्थी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघेही पुढे आले, याचा अर्थ त्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा केली असणारच.”
 
“दुसरं म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादीच संघटना बरीचशी ग्रामीण भागात आहे. त्यांचे हितसंबंध मराठा आणि काही प्रमाणात ओबीसींशी आहे. शिवसेनेचे असे संबंध नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये टक्कर होणार नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत टक्कर होईल. कारण प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितसंबंधांविरोधात नाहीय,” असं साठे म्हणतात.
 
युतीच्याच दिवशी जागावाटपावरून गोंधळ
जागावाटपावरून महाविकास आघाडीत गोंधळ होण्याची शक्यता आजपासूनच सुरू झाली, ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे.
 
पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “युती शिवसेनेने केली आहे आमची काही हरकत नाही. पण जागा वाटपात शिवसेनेने त्यांना आपल्या कोट्यातील जागा द्याव्यात. आम्ही आमच्या जागा देणार नाही. शिवाय आमचे उमेदवार असतील तिथे त्यांना मदत करावी लागेल. नाहीतर आम्ही मदत करणार नाही. महाविकास आघाडीत स्थान देण्याबाबत अजून आमची बैठक झालेली नाही. पण काँग्रेस आपल्या जागा त्यांना देणार नाही.”
 
मात्र, त्यापूर्वी म्हणजे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की, “जागा वाटपाचा विचार केल्याशिवाय एकत्र काही आलो नाहीय. दुसरं म्हणजे, महाविकास आघाडीत आमचं ठरलं आहे की, आपापल्या पक्षांनी आपल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं. महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला हरकत नाही.”
 
संभाजी ब्रिगेड ते ‘वंचित’... शिवसैनिकांचं काय?
ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव म्हणतात की, “शिवसेनेच्या स्वतंत्र बाण्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाच्या जाळ्यात ते अडकले नव्हते. तोवर शिवसेनेनं स्वतंत्ररित्या माणसं मोठी केली. मात्र, 2014 नंतर भाजपच्या जाळ्यात अडकल्यानं शिवसेनेत माणसं मोठी होण्याची प्रक्रिया संपली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना या सोशल इंजिनिअरिंगची गरज भासली असल्यास वावगं नाही.”
 
मात्र, अभिजित ब्रह्मनाथकर म्हणतात की, “शिवसेनेचे मतदार आणि कार्यकर्त्यांचं जाळं हे भ्रमात आहेत. त्यांना हे अजून ठरवता येत नाहीय की, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं बरोबर आहे की एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड केलं हे बरोबर आहे? निवडणुकीतूनच हे स्पष्टपणे कळू शकेल.”
 
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे मात्र शिवेसनेच्या संघटना उभारणीच्या इतिहासाकडे लक्ष वेधतात.
 
राजेंद्र साठे म्हणतात की, “उद्धव ठाकरे थोड्याफार प्रमाणात बदलू पाहतायेत, हे बरोबर आहे. पण शिवसेना ही संघटना उभी राहताना, हिंदुत्वाचं आकर्षण मोठं आहे. हे हिंदुत्व मुस्लिमांच्या विरोधातील आहे. दंगलीतला सहभाग किंवा मुस्लिमांच्या विरोधातला भातृभाव अशातून शिवसेनेची संघटना उभी राहिलीय.
 
“त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच महत्त्वाची घटना असली, शिवसैनिकांचा प्रतिसाद या निर्णयाला कसा मिळतो, हे आजच ठरवता येणार नाही.
 
शिवशक्ती-भीमशक्तीचे आधीचे प्रयोग
शिवसेनेचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील संशोधक सहाय्यक संजय पाटील यांनी शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या निमित्तानं दलित समाज आणि शिवसेनेच्या इतिहासावर फेसबुक पोस्ट लिहिलीय.
 
त्यातील संपादित अंश इथे आम्ही देत आहोत. यातून आजच्या घटनांचे संदर्भ कळण्यास मदत होईल.
 
“1973 साली मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआयच्या एका गटासोबत बाळासाहेब ठाकरे यांनी युती केली होती. ही युती मराठी माणसाच्या ऐक्यासाठी आहे, असे त्यावेळी ते म्हणाले होते.
 
“1974 मध्ये दालित पँथर आणि शिवसेनेमध्ये वरळी येथे दंगल झाली.
 
“पुढे आरक्षण आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासंबंधीची शिवसेनेची भूमिका सर्वांनाच माहीत आहे.
 
“पुढे 1987 मध्ये महाराष्ट्र शासनाने 'रिडल्स इन हिंदूइजम्' हा बाबासाहेब आंबेकरांच्या अप्रकाशित लेखांचा संग्रह असलेला ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शिवसेनेने त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. विविध राजकीय संघटनानी आपापल्या भूमिकांच्या समर्थनार्थ आंदोलने केली.
 
“प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा त्यावेळी हुतात्मा चौक येथे आंदोलन केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या भुजबळ यांसारख्या काही नेत्यांनी आंदोलनाची जागा धुवून स्वच्छ करत आंदोलन केले होते.
 
पुढे आरपीआयच्या विविध गटांनी कधी काँग्रेस सोबत तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती किंवा हातमिळवणी केली.
 
“2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत रामदास आठवले यांच्यासोबत हातमिळवणी करत 'शिवशक्ती - भीमशक्ती' चा प्रयोग केला होता. रामदास आठवले यांना या निवडणूकीत फार काही हाती लागले नाही. परंतु पुढे 2017 मध्ये जेव्हा सेना-भाजप यांची मुंबई महापालिका निवडणुकीत युती झाली नाही, त्यावेळी आठवले यांनी भाजप सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
 
“2019 च्या विधान सभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. उद्धव ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वपासून दूर जात सर्वसमावेशक विकास अशी भूमिका घेत आपले हिंदुत्व हे भाजप आणि आरएसएसपेक्षा वेगळे असून ते शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नसल्याचे अनेक भाषणातून मांडण्याचा प्रयत्न केला. ते बदललेल्या परिस्थितीत लोकशाही, मूलभूत हक्क, संघराज्य व्यवस्था, रोजगार, अर्थव्यवस्था याबद्दल  आपल्या भाषणात ठळकपणे भूमिका मांडू लागले.
 
“एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील बंडानंतर एकूणच राजकीय परिस्थिती बदलली आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीत नवीन सामाजिक बेरीज करण्याचा प्रयत्न ठाकरे यांच्या कडून सातत्याने होत आहे. सुषमा आंधरे यांच्या माध्यमातून ते दिसून येत आहे.
 
“बदललेल्या परस्थितीमध्ये भाजप विरोधातील लढाईत विविध संघटना सेनेला पर्याय म्हणून पाहत आहेत.”

Published By -Smita Joshi