शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (10:24 IST)

मुख्यमंत्री यांनी केली अधिकारी नियुक्तीला सुरुवात, विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला.  1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता. 2014 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून देखील काम पाहिले होते.
 
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे असलेले विकास खारगे यांचा जन्म 17 मार्च 1968 चा असून त्यांचे शालेय शिक्षण इचलकरंजीच्या शाहू नगरपरिषद शाळेत तसेच व्यंकटराव माध्यमिक शाळेत तसेच कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले.  पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून त्यांनी बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) ही पदवी संपादन केली.  तसेच युकेच्या युनर्व्हिसिटी ऑफ ससेक्समधून एम.ए. (गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट) पूर्ण केले.
 
प्रशासनाचा गाढा अनुभव
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे सहायक जिल्हाधिकारी, नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच यवतमाळ आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामगिरी केली.  मुंबई येथे विक्रीकर सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेचे संचालक, कुटुंब कल्याण आयुक्त, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे संचालक, राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त तसेच वन विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर ते होते.
 
अनेक पुरस्कार
विकास खारगे यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांना नुकताच नववा अर्थ केअर ॲवॉर्ड मिळाला आहे.  याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे कार्यालय राज्यातील पहिले पेपरलेस ई-ऑफिस केल्याबद्दल राजीव गांधी प्रशासकीय सुधारणा पुरस्कार, औरंगाबाद जिल्ह्यात धार्मिक सलोखा राखल्याबद्दल महात्मा गांधी शांतता पुरस्कार, त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात साक्षरता कार्यक्रम प्रभावीरित्या राबविल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते सत्येन मित्रा राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
प्रमुख योगदान
विकास खारगे यांनी शासनाच्या वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून केलेल्या कामगिरीचे देशपातळीवरुन कौतुक झाले आहे.  50 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड झाली.
 
कुटुंब कल्याण आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील लिंगदर 883 वरुन 934 इतका वाढला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 108 क्रमांक रुग्णवाहिका सुरु करण्यात आली असून आजमितीस 972 रुग्णवाहिका रुग्णांवर उपचार करीत  आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणून त्यांनी हाताने तसेच वीजेवर चालणारे पंप तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे पंप कालांतराने सौरऊर्जेवर देखील चालण्याची व्यवस्था करण्यात आली. बालमजुरी निर्मूलनाच्या कार्यक्रमात औरंगाबादचे जिल्हाधिकारी असताना 4 हजार बालमजुरांची सुटका करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग
विकास खारगे यांनी अनेक आंतरराष्ट्रीय बैठका आणि परिषदामध्ये सहभाग घेतला आहे.  यामध्ये थायलंड, स्वीडन, यूके, ब्राझिल, दक्षिण कोरिया, बांग्ला देश, मलेशिया, स्पेन, सिंगापूर, केनिया, चीन, अमेरिका, दुबई, पोलंड आणि इस्त्रायल अशा देशांचा समावेश आहे.
त्यांनी पंचायत राज सिस्टिम-ए न्यू रोल नावाचे पुस्तक लिहिले असून 'यशदा'ने ते प्रकाशित केले आहे.