1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (10:10 IST)

उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे सभा: 1 यू टर्न, 1 कार्यक्रम, 6 हुकूमशहांचा संदर्भ निवडणुकीत मतं मिळवून देईल?

लोकसभा, विधानसभा आणि सर्व महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांचं घोडामैदान आता दूर नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून त्याचाच प्रत्यय येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर दसरा मेळावा घेतला.
 
मराठा आरक्षण हा या निवडणुकांमध्ये कळीचा मुद्दा ठरू शकतो याची कल्पना दोन्ही नेत्यांना आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांची स्तुती करत थेट मोदी सरकार आणि भाजपवर हे प्रकरण टोलवण्याचा प्रयत्न केला.
 
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं.
 
मनोज जरांगे पाटील यांच्या रुपानं एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहाता त्यांनी पुन्हा आंदोलन करू नये यासाठी शिंदे सरकारचा प्रयत्न असेल.
 
तर उद्धव ठाकरे यांनी जरांगेंची स्तुती करून एक प्रकारे त्यांच्या आंदोलनाला हवा देऊन शिंदेच्या अडचणी कशा वाढतील याची तजवीज केली आहे.
 
जाता जाता उद्धव ठाकरेंनी जरांगे पाटलांना भाजपापासून सावध राहाण्याचा इशाराही देऊन टाकला. नाराज मराठा मतं आगामी काळात आपल्या बाजूने कशी वळतील याचा प्रयत्न म्हणूनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या या सल्ला आणि स्तुतीकडे पाहता येऊ शकतं.
 
तसं मराठा मूक मोर्चावेळी सामनातून प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून तेव्हाच्या शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर नामुष्की ओढावली होती हे विसरून चालणार नाही. तेव्हा व्यंगचित्र मागे घेत सामनाला माफी मागावी लागली होती हा अलीकडचा इतिहास आहे.
 
पण तो इतिहास विसरून उद्धव ठाकरे यांनी पुढे पाऊल टाकलं आहे हे खरं.
 
निवडणूक कार्यक्रम
अर्थात निवडणुकीचं राजकारण हे बेरजेचं राजकारण असतं हे आता एव्हाना उद्धव ठाकरे यांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. (म्हणूनच ते प्रकाश आंबेडकरांशीसुद्धा जुळवून घेत आहेत.)
 
पण निवडणुकांच्या आधी कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागतो. त्यांच्या उत्साह संचारेल असं काहीतरी करावं लागतं.
 
यंदा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तो कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
सध्या 1 रुपयाच्या कृषी विम्याचा विषय ग्रामीण भागात चांगलाच गाजतोय. राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांची खरिपाची पिकं वाया गेली आहेत. परिणामी त्यांना विम्याच्या रकमेची अपेक्षा आहे. पण, अनेक ठिकाणी शेतकरी या कृषीविम्याच्या निकषांमध्ये बसत नसल्याची ओरड होते आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी हे हेरून त्यांच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी विमा अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आदेश दिला आहे. “त्यांना मारझोड करू नका, घेराव घाला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
मुंबई-ठाणे वगळता उर्वरित भागातल्या शिवसेना कार्यकर्त्यांना कार्यक्रम देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या विषयाला सुद्धा हात घातला.
पुन्हा तोच राग आळवला
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा दिल्लीचा डाव असल्याचा राग त्यांनी पुन्हा एकदा आळवला आहे. मुंबईचं महत्त्व कमी करत असल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला.
 
“मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्याच्या शरीराचे तुकडे करू, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं तर तुमचं सरकार जाळू,” वगैरे सारखी वक्तव्यं त्यांनी केली. पण ती पुरेशी नसल्याचं बहुदा त्यांना लक्षात आलं असावं म्हणूनच त्यांनी यंदा धारावीच्या पुनर्वसनाच्या मुद्द्याला हात घालून भाजपला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला.
 
"हे लोक आता धारावीही गिळायला निघाले आहेत. आता ज्याच्या घशात धारावी यांनी घातली आहे, तो यांचा मित्र आहे. 150 कोटी स्क्वेअर फूटांचा एफएसआय मिळणार आहे. हा विकास फक्त तुमच्या मित्राचे खिसे भरायला होऊ देणार नाही."
 
"धारावीत जो झोपडीत राहतो, त्याला हक्काचे घर मिळालंच पाहिजे. पण प्रत्येक घरात जे उद्योगधंदे आहेत, त्यांनाही तिथं जागा मिळावी.धारावीच्या एका जागेत घरं बांधा, पण गिरणी कामगारांच्या मुलांनाही तिथं घरे द्या. पोलिसांना घरं कमी पडत असतील तर त्यांनाही तिथं घरे द्या. फक्त धनदांडग्यांची मुंबई करू नका," असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
 
शिवाय या मुद्द्यावर धारावीत वेगळी सभा घेऊन आणखी भूमिका स्पष्ट करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. एकंदरच येत्या काळात हा उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा मुद्दा असणार आहे असं दिसून येतंय. (धारावी तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचा गड मानला जातो.)
 
मोदींचं नाव न घेता टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सभांमधून कायम घराणेशाहीवर प्रहार करत असतात. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात स्वतःच्या घराणेशाहीचं समर्थ करत नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
 
त्यांनी त्यांच्या भाषणात एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं नाही. पण त्यांची थेट तुलना त्यांनी वेगवेगळ्या हुकूमशहांशी केली.
 
उद्धव ठाकरे म्हणाले,
 
“मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाहीत, ते घराणेशाहीवर बोलणारे कोण?"
 
“मग जशी घराणेशाहीची पंरपरा आहे तशीच काही नावं अशी आहेत ज्यांच्या घराण्याचा आतापताच नाहीये, पण तरी ते सत्ताधीश झाले. फरक बघा तुम्ही. हिटलरचे वडील माहिती आहेत तुम्हाला? हिटलर काही घराणेशाहीतला होता? सद्दाम हुसैन काही घराणेशाहीतला होता? पुतीन काही घराणेशाहीतला आहे? गड्डाफी काही घराणेशाहीतला आहे? मुसोलिनी, स्टॅलिन, कोणाची घराणी माहिती आहेत?
 
पण हाही धोका विसरू नका ही ज्याचा काही आगापिछा नाही त्याच्या हातामध्ये जर का देश दिला तर काय होऊ शकतं त्याचं अत्यंत वाईट उदाहरण हे जर्मनी आहे. असाच उदय झाला, लोक पागल झाले, अंध भक्त झाले, आज त्यांना जे काही बहुमत मिळालं आहे हे काहीच नाही जवळपास 95-97 टक्के त्यावेळी हिटलरला बहुमत मिळालं होतं. विकासाच्याच नावावर. काय केलं त्यांनी आज जाऊन जर का विचारलं तर जर्मन लोकांना लाज वाटते की त्यांच्या देशामध्ये हिटलर होऊन गेला म्हणून.
 
मग तुम्ही ठरवायचं आहे की ज्याच्या घराण्याचा आगापिछा माहिती आहे असा निवडायचा की कोणाचा कशाला पत्ता नाही, आज दिसतोय उद्या गायब. तुमचं मरण तुम्ही पत्करा. मी माझं वाट लावण्याचं काम केलं आहे. मला आनंद झाला आहे तुमची वाट लागली, आता मी झोळी लावून चाललो, तुम्ही बसा रिकामे कटोरे घेऊन.”
 
असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन केलं आणि एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत देऊ नका असंसुद्धा सांगून टाकलं.
 
“सरकार बदललं पाहिजे, एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार नको, खूर्ची डगमग असेल तेव्ही चांगलं काम होतं,” असा दावा त्यांनी केला.
 
मनमोहन सिंह यांच्या मुद्द्यावरून यू टर्न
"याच व्यासपीठावरून बाळासाहेब म्हणाले होते, देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. नऊ वर्षांपासून आपण ते मजबूत सरकार पाहिलं. 25 वर्षांनंतर एका पक्षाचं सरकार आलं त्यामुळं स्थैर्य येईल असं वाटलं पण तसं झालं नाही. आता जे सरकार आणायचं ते एका पक्षाचं पाशवी बहुमत असलेलं सरकार नको,"
 
असं म्हणत उद्धव ठाकर ठाकरे यांनी मोदींच्या आधी आघाडी सरकारं चालवणाऱ्या नरसिंह राव, मनमोहन सिंह, अटलबिहारी वाजपेयी यांनीही चांगलं काम केल्याचं म्हटलंय.
 
पण त्यापैकीच मनमोहन सिंग यांच्यावरच आघाडी सरकार चालवत असताना उद्धव ठाकरे यांनी अशालाघ्य भाषेत टीका केली होती. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते.
 
आता मात्र मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी मनमोहन सिंहांबाबत यू टर्न घेत त्यांची स्तुती केली आहे. त्यांच्या आघाडी सरकारच्या काळात चांगलं काम झाल्याचं म्हटलं आहे.
यांना खोके नाही कंटेनर लागतात’
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभेत आधीच स्पष्ट केलं की ते पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर फार बोलणार नाहीत. तरी त्यांनी त्यांच्यावर बरीच टीका केली.
 
एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा उत्तरार्ध बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंवर टीका करणारा होता. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी थेट लाचखोरीचा आरोप केला आहे.
 
“न्यायालयाने धनुष्यबाण आपल्याला दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी बँकेकडे मागितले. नंतर त्यांनी ते पत्र आपल्याला पाठवलं. मी क्षणाचाही विलंब न करता ते पैसे त्यांना द्यायला सांगितले,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
“यांना खोके पुरत नाहीत. यांना कंटेनर लागतात. याचा साक्षीदार माझ्याशिवाय दुसरा कोण असू शकतो,” असा दावा त्यांनी केला आहे.
 
“शिवतीर्थावरील मेळावा दसरा मेळावा नाही तो शिमगा आहे. वर्षभर शिंदे, मोदींच्या नावाने शिमगा सुरू असतो.आताही तिथे टोमणे सुरू असतील, त्यांनी दसरा मेळावा शिमगा म्हणून साजरा करावा,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.
 
शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरे आणि दिघेंचाच फोटो
उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. तर एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर मात्र बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.
 
शिवाय एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या व्यासपीठावर त्यांना साथ देणाऱ्या 40 आमदारांपैकी सर्व ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या आमदारांना जागा देण्यात आली होती.
 
शिंदेंच्या सभेत लक्ष वेधून घेतलं हे टोप्या घातलेल्या मुस्लिम तरुणांच्या चमूने. आतापर्यंत मुंबई आणि परिसरातील मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं चित्र वेगवेगळ्या ठिकाणी दिसत होतं. ते मोडण्याचा प्रयत्न बहुदा शिंदेंच्या पक्षाकडून झाल्याचा दिसून आला.
 
एका मुद्द्यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकच भूमिका मांडली. तो मुद्दा म्हणजे आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये. दोन्ही नेत्यांनी वेगवगेळ्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली आहे.
 























Published By- Priya Dixit