उद्धव ठाकरे कोरोनामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेट बैठकीत
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. याचा अर्थ काय याचा उलगडा काही वेळात होईल असा कयास आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे सर्वाधीक आमदार असल्याचं पुन्हा एकदा बोलून दाखवलं आहे. आता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहात आहेत. त्यांची कोरोनाची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री या बैठकीसाठी जमा झालेआहेत मात्र शिवसेनेचे गुवाहाटीला असणारे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहाणार नसल्यामुळे या बैठकीला काहीसं वेगळं रुप आलेलं दिसेल.
तत्पूर्वी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. तर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही भेटून या स्थितीवर चर्चा केली.
काँग्रेसच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे आमदार एकत्र आहेत. आम्हाला कोणीही प्रलोभन देऊ शकत नाही असं सांगितलं.
आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर हँडलच्या बायोमध्ये मंत्रिपदाचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे, असं सांगण्यात येतंय तर काही माध्यमांच्या मते त्यात काहीही बदल झालेला नाही.
त्यामध्ये व्हॉइसिंग द युथ, पोएम्स अँड फोटोग्राफी- पॅशन, प्रेसिडेंट युवासेना, प्रेसिडेंट मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन लिहिलंय. त्यामुळे आता यापुढे ते काय पाऊल उचलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईत आज वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान सागर येथे दाखल झाल्या आहेत.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदारांचा समूह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झाला आहे. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.