शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (15:26 IST)

उद्धव ठाकरेंनी मुद्दे मांडायला आता एखाद्या प्रवक्त्यांची नेमणूक करायला हवी, दीपक केसरकर यांचा टोला

Deepak Vasant Kesarkar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच दावोस दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दावोस दौऱ्यात ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला, असा आरोप त्यांनी केला. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी काय केले, याचा तपशील जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. उद्धव ठाकरेंनी मुद्दे मांडायला आता एखाद्या प्रवक्त्यांची नेमणूक करायला हवी.” असा टोला त्यांनी मारला.
 
आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही. त्यामुळे रोज काहीतरी बोलून स्वत:चे हास्य करून घेणे योग्य नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलून खात्री करून घ्यावी. जगभरातील लोक दावोसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला असे होत नाही. दावोस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कमर्शियल विमानाचे तिकीट बूक केले होते. १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते.

राज्यात पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटने मुंबईत आले. प्रत्येक दौऱ्याची आणि त्यासाठी झालेल्या खर्चाची नोंद सरकार दरबारी असते. सरकारचे ऑडिट स्ट्रिक्ट असते, ज्यांना अनुभव आणि परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असेच बोलतात. सत्ता गेली ठीक आहे. पण थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नये. डोक्यात राग ठेऊ नका, थोडे शांत व्हा, असे ते म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor