बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:04 IST)

‘कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त असल्याने उद्धव ठाकरेंना मानेचं दुखणं सुरु झालं’ – किरीट सोमय्या

राज्यात गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या  हे आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या घोटाळ्याबाबत आरोपांचा सपाटाच धरला आहे. तर, उद्धव ठाकरे सरकार आलं तेव्हापासून राज्यातील घोटाळेबाज मंत्र्यांचे आतापर्यंत मी 28 घोटाळे बाहेर काढले असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत मी या अलिबाबा चाळीस चोर सरकार मधील 40 चोर बाहेर काढणार असल्याचं खळबळजनक विधान सोमय्यांनी केलं आहे. त्यावेळी ते बुलढाण्यात बोलत होते.
सोमय्या बुलढाणा अर्बन मुख्यालयात चौकशीसाठी आले होते.यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर  जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते.त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेचं दुखणं सुरू झालं, असा टोला लगावला आहे.तसेच, ठाकरे लवकर बरे होवोत अशा सदिच्छाही त्यांनी दिल्या आहेत.
 
पुढे सोमय्या म्हणाले, अशोक चव्हाणांच्या साखर कारखाण्यासंबंधी कर्जाच्या प्रकरणाच्या माहिती घेण्यासाठी आज मी आलो चौकशी केली.लातूर जिल्हा बँकेच्यासंबंधी अमित देशमुखांची आम्ही ईडीकडे तक्रार केलीय, त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.तसेच अमित देशमुख, अशोक चव्हाण, अर्जुन खोतकर, नवाब मलिक, एक-एक चौकशी सुरू आहे पुढे बघू.आम्हाला राज्यातील सर्व पोलिटिकल करप्शन संपवायचंय. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचंय असं देखील त्यांनी म्हटलं आहे.