रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:39 IST)

उदगीर : मराठी साहित्य संमेलनाचं वेळापत्रक, कोणत्या तारखेला कोणते कार्यक्रम?

फोटो साभार -सोशल मीडिया 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं पार पडणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होणार आहे.
 
संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह लातूरमधील सर्व पक्षांचे आमदार आणि खासदार या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत.
 
देशभरातील 1000 पेक्षा जास्त मराठी साहित्यिक आणि कवींना या संमेलनात निमंत्रित करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी उदगीरच्या 'महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या' प्रांगणात पार पडणार आहे
 
94 वे साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबरला नाशिक येथे पार पडले होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच साहित्य संमेलन होणार आहे. 94 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते. कोरोना काळानंतरचं हे पहिलंच अधिवेशन होतं.
 
 
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीने हे संमेलन गाजलं होतं. आता हनुमानचालिसा, मशीदीवरचे भोंगे, भारनियमन, पेट्रोलच्या दरांचा उडालेला भडका अशा अनेक ज्वलंत प्रश्नांच्या पडछायेत हे संमेलन होणार आहे. या विषयावर साहित्यिक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
यावर्षी संमेलनाध्यक्ष भारत सासणे असून संजय बन्सोडे स्वागताध्यक्ष असतील. यावर्षीच्या साहित्यनगरीला लता मंगेशकरांचं नाव देण्यात आलं आहे.
 
या वर्षी रसिकांसाठी काय आहे?
20 एप्रिल रोजी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रमाने साहित्य संमेसलनाची सुरुवात होणार आहे. 21 तारखेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रम साहित्य संमेलनात असल्याने सोशल मीडियावर टीका झाली होती.
 
22 एप्रिलला ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरुवात होईल. त्यानंतर ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन, चित्र-शिल्प-कला प्रदर्शनाचे उदघाटन ईल. त्याच दिवशी अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन, कविकट्टा उद्घाटन यांसारखे कार्यक्रम पार पडतील.
 
दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक चर्चा आणि परिसंवादाचे आयोजन साहित्य संमेलनात करण्यात आलं आहे. : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : काय कमावले, काय गमावले?, मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण : किती खरे, किती खोटे?, मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्रीवादात अडकले आहे का? या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हे परिसंवाद 22 एप्रिलला होतील
 
23 एप्रिलला ज्येष्ठ लेखक राजन गवस यांची प्रकट मुलाखत आहे. त्यानंतर मान्यवर लेखक प्रकाशकांचा सत्कार आहे. तसंच आजच्या कादंबरीकारांशी संवादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
 
याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बालसाहित्याचं वाचन, बाळमेळावा उद्घाटन आहे. विशेष म्हणजे निमंत्रितांचं बाल कविसंमेलनही आयोजित करण्यात आलं आहे. एकूणच बाल साहित्यावर या संमेलनात भर देण्यात आला आहे. कविकट्टा आणि गझलमंच हेही कार्यक्रम 23 तारखेला होतील.
 
24 एप्रिल म्हणजे शेवटच्या दिवशी अवधूत गुप्ते संगीत रजनीचा कार्यक्रम आहे. तसंच वाचन साहित्य आणि आधुनिकता, सीमाभागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार ? या विषयावर परिसंवाद आहे. या दिवशीही बालकादंबरी वाचन आणि बालसाहित्यिकांशी संवाद व गप्पा आणि सरतेशेवटी समारोपाचा कार्यक्रम आहे.