1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:24 IST)

१८ मंत्र्यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारांची १ कोटी ३९ लाख २६,७२०रुपयांची बिले

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराची लाखो रुपयांच्या बिलाची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाकाळात सरकारमधील १८ मंत्र्यांनी मात्र खासगी रुग्णालयातच सर्वाधिक उपचार घेतले. या २ वर्षांत १८ मंत्र्यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारांची १ कोटी ३९ लाख २६,७२०रुपयांची बिले सरकारी तिजोरीतून देण्यात आली आहे.
 
सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करण्याचे टाळत खासगी रुग्णालयात केलेल्या उपचारांचे बिल ३४ लाख ४० हजार ९३० रुपये इतके झाले आहे. या यादीत राजेश टोपे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे खासगी रुग्णालयातील उपचारांचे बिल १७ लाख रुपये, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे १४ लाख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार १२ लाख, जितेंद्र आव्हाड ११ लाख, छगन भुजबळ ९ लाख, सुनील केदार ८ लाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील ७ लाख, सुभाष देसाई ७ लाख, अनिल परब यांच्या ६ लाख ७९ हजारांची बिले राज्य सरकारच्या तिजोरीतून भरण्यात आली आहेत.
 
सन २०२० ते २०२२ या वर्षांत मंत्र्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या २९ बिलांची प्रतिपूर्ती सरकारी तिजोरीतून झाली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी, लीलावती व बॉम्बे रुग्णालयातील सर्वाधिक बिले आहेत. त्यामुळे स्वत:वर उपचारांसाठी मंत्र्यांचे सरकारीपेक्षा प्राधान्य खासगी रुग्णालयांनाच असल्याचे स्पष्ट होते.