रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (08:41 IST)

केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन, प्रकरण गांभीर्याने घेतले- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

nitin gadkari devendra
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. हा फोन बेळगाव तुरुंगातून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने नितीन गडकरींच्या मोबाईलवर फोन करून त्यांना जीवाची धमकी देत पैशांची मागणी केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर नागपूर पोलीस हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आरोपीच्या शोधासाठी दाखल झाले आहेत. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "नितीन गडकरींना आलेला धमकीचा फोन, ही खूप धक्कादायक बाब असून आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत."
 
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. तात्काळ तो फोन ट्रेस करून गुन्हा दाखल केला. फोन करणारा आरोपी बेळगावच्या कारागृहातून फोन करत होता. यामागे त्याचा काय हेतू होता? तसेच, यामागे आणखीन कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलीस विभाग करत आहेत. तसेच, त्याने कारागृहातून फोन कसा केला? याचा तपास कर्नाटक सरकार करत आहे. त्यानुसार ते कारवाई करतील." मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांना शनिवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून ते बेळगावमध्ये दाखल झाले. कोल्हापूर ,सांगली आणि बेळगाव पोलीसदेखील त्यांना तपासामध्ये मदत करत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor