सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (20:51 IST)

नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

cyclone
नाशिक शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा ,द्राक्षे, टरबूज, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर त्या सायंकाळच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
शहरात सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास ढग दाटून आले होते. यानंतर पावणे सहा वाजेच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह शहरातील मेनरोड परिसरासह सातपूर, सिडको, परिसरातील काही भागांत हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धांदल उडाली. दरम्यान,  काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस झाला. त्यामुळे चिमुकल्यांनी पावसासह पडणाऱ्या गारांचा आनंद घेतला.  
 
ग्रामीण भागात पिंपळगाव, सिन्नर आदी भागात सिन्नर शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामधील कोनांबे, भाटवाडी, हरसुले ,सोनांबे, पाडळी, टेभुरवाडी, डुबेरे, ठाणगाव, आदी भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यांवर व शेतात गारांचा ढीग साचला आहे. तर शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या कांद्याभोवती पावसाचे पाणी साचल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor