शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (07:47 IST)

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन पद्धतीने लसीकरण

परदेशात जाण्यापूर्वी लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे शहरातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्राधान्याने लस दिली जाणार आहे. महापालिकेच्या पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात सोमवारपासून (३१ मे ) वॉक इन पद्धतीने लसीकरणास सुरुवात होणार आहे. तरी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया शहरातील विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
 
परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, यासाठी त्यांना प्राधान्याने लसीकरण सुविधा देण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केल्याच्या तसेच महापौर म्हस्के यांनीही यासंदर्भात पत्र दिले होते, त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी परदेशी जाणाºया ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना वॉक इन पद्धतीने लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ही थेट लसीकरण सुविधा सकाळी ११ ते २ या वेळेत उपलब्ध केली आहे. ठाण्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य त्या पुराव्यानिशी म्हणजे परदेशात प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून लस देण्यात येणार आहे. सोमवारी प्रथम ५० विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते २ या वेळेत लस देण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार लसीकरणाचे वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे. तरी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.