शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

प्रसिद्ध तबला वादक भाई गायतोंडे यांचं निधन

ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचं गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. ते ८७ वर्षाचे असून ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. दिलीप गायतोंडे, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
ज्येष्ठ तबदलावादक पं. अहमदजान थिरकवा यांचे शेवटचे शिष्य अशी त्यांची ओळख होती. पंडित जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष तबलावदानाचे धडे गिरविले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ तबलावादक पंडित अहमदजान थिरकवा यांच्याकडेही त्यांनी तबला वादनाचे धडे घेतले होते. तबला वादन या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.
 
पेशाने केमिकल इंजिनिअर असूनही तबलावादनाकडे त्यांचा कल अधिक होता. त्यांना क्रिकेटची आवड असलेल्या त्यांनी रणजी क्रिकेटमध्येही छाप पाडली होती. 
 
तबलावादन ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यापीठांसह राहत्या घरीही त्यांनी सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना तबल्याचे निःशुल्क प्रशिक्षण दिले.
 
मात्र गुरूवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने ११.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.