कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
गेल्या पंधरा दिवसापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आज सायंकाळपासून कोल्हापुरात पावसाने जोर धरला. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानं पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसाने अचानक दडी मारल्याने भात पिक वाळणीला लागले होते. यामुळे शेतकरी चिंतेत होता. तर गेल्या चार दिवसांपासून वातावरणात उष्मा खूप होता. पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर अचानक पाऊस आल्याने नागरीकांची काहीकाळ धांदल उडाली.