खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे
खेड तालुक्यातील प्रास्तावित रेल्वे आणि रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प आहेत. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. यासाठी रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या समस्या आणि भावना जाणून घेण्यासाठी खासदार कोल्हे राजगुरूनगर येथे आले होते. यावेळी बोलताना अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांना शब्द दिला आहे.
रेल्वे प्रकल्प आणि रिंग रोड अंमलात येणं गरजेचं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत समाधानकारक तोडगा काढूनच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यास प्राधान्य राहील. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा करणार असुन शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
खेडमध्ये होणारं विमानतळ रद्द झाल्याने खेड तालुक्याचं मोठं नुकसान झालं आहे. पण पुणे नाशिक रेल्वेमुळे हा मतदार संघ थेट उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडला जाणार असल्याने विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो अंमलात येणं गरजेचं असल्याचं कोल्हे म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांना न्याय देण्याचीच शासनाची भूमिका राहील. रेल्वेमार्ग बाधित शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाटाघाटींद्वारे ठरवली जाणार आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. रेल्वे आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्याचे प्रयत्न करणार आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.