शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (08:06 IST)

माझ्यासोबत जे घडल ते चुकीचं…माझा संघर्ष सुरूच राहील- सिकंदर शेख

माझ्यासोबत जे घडल ते चुकीचे घडले असून माझ्या कोचलाही हाकलून देण्यात आले. पंचांनी केवळ फ्रंटचा कॅमेरा बघूनच निर्णय दिला. बॅक कॅमेरा पाहण्यात आला नसल्याची खंत उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी व्यक्त केली आहे. ते  कोल्हापूरात आपल्या शाहू विजयी गंगावेश तालमीत माध्यमांशी बोलत होते.
 
काही दिवसापुर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत  पराभवाला सामोरे जावे लागलेल्या सिकंदर शेख  यांनी माध्यमांशी संवाद साधला. या स्पर्धेत विजेता मल्ल महेद्र गायकवाड  याला नियम बाह्य गुण दिल्याच्या चर्चांना माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये ऊत आला आहे. आज उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ते म्हणाले, “माझ्यासोबत जे काय झालं ते चुकीचं झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ उगाच झाला नाही. केवळ समोरचा कॅमेरा पाहून निर्णय घेण्यात आला मागील कॅमेराने तपासण्यात आला नाही. तसेच याचा जाब विचारायला गेलेल्य़ा माझ्या कोचला देखील तिथून हाकलून लावण्यात आलं. काय चुकीचं करताय…काय बरोबर करताय सर्वांना दिसत आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.
 
पैलवान संग्राम कांबळे  यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पंच सातव यांना धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, “संग्राम कांबळे यांनी कोणतीही धमकी दिली नाही. ती रेकॉर्डिंग मी ऐकलेली आहे. त्यामध्ये कोणतीही शिवीगाळ किंवा अपशब्द वापरला गेला नाही. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कोणतीही गोष्ट तेथे घडलेली नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा जाब प्रत्येक पैलवानाला विचारण्याचा हक्क आहे. आज हे विचारलं नाही तर पुढच्या काळातही हे असच चालत राहील” असेही ते म्हणाले.
 
शेवटी बोलताना ते म्हणाले, “माझ्यावर प्रेम करणारे सर्वजण मला फोन करून विचारतात. माझे हार हे माझे आई-वडील आणि कोच सहन करू शकले नाहीत ते अजून सुद्धा दुःखात आहेत. मी आतापर्यंत खूप वेळा हरलो आहे मात्र माझा संघर्ष सुरूच राहील.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Edited By - Ratnadeep Ranshoor