शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (10:07 IST)

आचार्य अत्रे जेव्हा म्हणाले, 'बाबासाहेबांनी बिनपाण्यानेच केली हो आमची'

babasaheb ambedkar
'जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे, तिचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ती कधी होत नाही', असं आचार्य अत्रे म्हणत. अत्रेंचे जवळचे स्नेही आणि महाराष्ट्रातील दिवंगत माजी संपादक गोविंद तळवलकर यांनी हे विधान नमूद करून ठेवले आहे.
 
अत्रेंनी जीवनाबद्दल केलेल्या या वर्णनाप्रमाणेच ते स्वत:ही जगले. कलेच्या विविध प्रांगणात ते मनमुरादपणे वावरले आणि आपला अवीट ठसा उमटवला.
 
शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रांमध्ये आचार्य अत्रेंनी भरीव काम केलं. यातल्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग व्यक्तिमत्व झाले, मात्र सर्वच क्षेत्रात सहजपणे यशस्वी मुशाफिरी करणारा अवलिया म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे.
 
ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत म्हणतात, त्याप्रमाणे, महाराष्ट्र संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांत अत्रेंनी केवळ मुक्त वावर केला नाही तर अधिराज्य गाजवले. ते जिथे जिथे वावरले, त्या त्या राज्यांचे अनभिषिक्त सम्राट बनले. त्यांनी उत्तमोत्तम नाटके व चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केलेच, शिवाय 'मराठा', 'नवयुग' या सारख्या दैनिक, साप्ताहिकांचे संपादनही केले.
 
लेखक, कवी, विडंबनकार, चित्रपट कथालेखक, नाटककार, दिग्दर्शक, फर्डा वक्ता, शिक्षक, राजकीय नेता, संपादक अशा दशगुणांनी मंडित व्यक्ती म्हणजे अत्रे, अशा शब्दात भारतकुमार राऊत अत्रेंचं वर्णन करतात.
 
13 ऑगस्ट 1898 रोजी प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म झाला. अत्रेंच्या निधनालाही आता पन्नास वर्षे उलटून गेले आहेत. मात्र, आजही अत्रेंची विविध क्षेत्रातली मुशाफिरी आजही आठवली जाते.
 
आता पन्नाशीच्या आगे-मागे असलेल्या पिढीनंही अत्र्यांनी गाजवलेला काळ अनुभवला नाहीय. पन्नाशीच्या आतील वयाच्या माणसांचा तर प्रश्नच नाही. मात्र, कऱ्हेचे पाणी, मी कसा घडलो, हार आणि प्रहार, अत्रे उवाच अशा पुस्तकांमधून आचार्य अत्रे कळतात. त्यांचा आवाका आपल्या लक्षात येतो.
 
अत्र्यांसोबत काम केलेले, त्यांची भाषणं ऐकलेल्या व्यक्तीही महाराष्ट्राच्या वैचारिक क्षितिजावर अजून आहेत. याच व्यक्तींशी बोलून आम्ही अत्र्यांचे काही प्रसंग गोळा केले. अत्रेंचं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी हे प्रसंग पुरेशे नसले, तरी अंदाज लागण्यास पुरेसे ठरतील.
 
अत्रेंच्या जन्मदिनाचं औचित्य साधत बीबीसी मराठीनं अत्रेंच्या आयुष्यातील काही प्रसंग आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
आचार्य अत्रे हे मूळचे शिक्षण क्षेत्रातील. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आधी मुंबईत सँडहर्स्ट हायस्कूलमध्ये शिक्षक होते. नंतर पुण्यात आल्यावर कँप एज्युकेशन सोसायटीचे ते हेडमास्टर होते. नवयुग वाचनमाला किंवा अरूण वाचनमाला तर आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. याच दरम्यानचा एक किस्सा आहे.
 
1) विद्यार्थ्यांसाठी कोर्टात साक्ष दिली
हा किस्सा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितला.. खरंतर उल्हासदादा पवार हे आचार्य अत्रेंची भाषणं ऐकलेली व्यक्ती. पण हा किस्सा त्यांच्या आईच्या मामांचा आहे.
 
उल्हासदादा पवारांच्या आईचे मामा म्हणजे शंकरराव जाधव हे कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील आचार्य अत्रेंचे विद्यार्थी होते. शंकरराव जाधव आणि त्यांचा मित्र बबनराव औताडे यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावर एक छोटीशी कादंबरी लिहिली होती. 'इश्श्य.. मेला नवरा' असं त्या कादंबरीचं नाव. कादंबरीची कथा ब्राह्मणविरोधी होती. त्यामुळे वाद झाला आणि तो कोर्टापर्यंत पोहोचला.
 
या विद्यार्थ्यांच्या बाजूनं साक्ष द्यायलं कुणीच पुढे येईना. शेवटी शिक्षक म्हणून आचार्य अत्रे पुढे आले आणि त्यांनी साक्ष दिली.
 
पत्रकारिता-राजकारण-समाजकारण करण्याआधी आचार्य अत्रे हे मूळचे शिक्षणसेवक होते, असं उल्हासदादा सांगतात. विद्यार्थ्यांना हसवता-हसवता ते रडवत असत.
 
पुढे शिक्षण क्षेत्र सोडून ते स्वातंत्र्य चळवळीत आले आणि काँग्रेसमध्ये सक्रिय झाले.
 
2) फाळणीनंतर काँग्रेस सोडली
खरंतर आचार्य अत्रे हे मूळचे काँग्रेसचे. बरीच वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये कामही केलं. काँग्रेस महाराष्ट्रभरातील सभा ते गाजवत असत. मात्र, फाळणीचा निर्णय अत्र्यांना काही आवडला नाही आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले.
 
तेव्हाचा हा किस्सा आनंद घोरपडे यांनी 'प्रतिभावंतांचे विनोदी किस्से' या त्यांच्या पुस्तकात सांगितला आहे.
 
भारत-पाकिस्तान फाळणी ही काँग्रेसची एक अक्षम्य ऐतिहासिक चूक आहे, असे त्यांचे प्रामाणिक मत होते.
 
ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी नाराजीचं कारणही जाहीरपणे सांगितलं. अत्रे म्हणाले, "काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणीची चूक केली याबद्दल माझे काँग्रेस नेत्यांशी भांडण नाही. पण आपण चूक केली असे काँग्रेस नेत्यांना वाटतच नाही, ह्याविरुद्ध आक्षेप आहे."
 
त्याचदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ त्यावेळी म्हणाले होते, "पाकिस्तान झाला हा काँग्रेसचा विजय आहे. कारण बॅरिस्टर जिना संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण बंगाल मागत होते. आम्ही तो अर्धा अर्धा कापून त्यांच्या हातावर ठेवला."
 
गाडगीळांना उत्तर देताना अत्रे म्हणाले, "आपले मुंडके कापण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला फक्त आपण आपले नाकच कापू दिले हा आपण दरोडेखोरावर केवढा विजय मिळवला, असे म्हणण्यासारखे हे आहे."
 
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते समाजवादी पक्षाकडे वळले. पण तिथेही त्यांचे फारसे काही जमले नाही. तितक्यात संयुक्त महाराष्ट्राची हाक देत आंदोलनालाही सुरुवात झाली आणि आचार्य अत्रे ताकदीनिशी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरले.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळळीवेळीचाच एक प्रसंग आहे. हा प्रसंग आचार्य अत्रे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील सुसंवादी संबंध दाखवून देणाराही आहे.
 
3) "बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची."
एस. एम. जोशी यांच्या 'मी एस.एम.' या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे.
 
एस. एम. आणि अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी काहीतरी मतभेद झाले. दोघेही निवाडा करण्यासाठी डॉ. आंबेडकरांकडे गेले.
 
एस. एम. यांचे म्हणणे सत्तेत जाऊ नये असे होते, तर अत्रे यांचे म्हणणे सत्तेत राहून लढाई करणे असे होते. अत्रे आणि बाबासाहेब एकमेकांच्या प्रेमातले. तरीही बाबासाहेबांनी एस. एम. यांच्या बाजूने मत दिले.
 
बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाले, तर जे एस. एम. जोशी यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. बाबासाहेब म्हणाले, "जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल, तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये."
 
बाबासाहेब म्हणाल्यावर अत्र्यांनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे एस. एम. यांना जे म्हणाले जे एस. एम. यांनी नमूद करून ठेवले आहे, "बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची."
 
आचार्य अत्रेंनी टीकेलाही मर्यादा ठेवली. ते ज्यावेळी कौतुकाची वेळ असेल, तेव्हा त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. यशवंतराव चव्हाणांबाबतचा एक किस्सा तसाच आहे.
 
4) यशवंतराव चव्हाणांवर टीका आणि 'ते' निरोपाचं भाषण
आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा खरंतर सर्वश्रुत आहे. आचार्य अत्रे यांनी एका भाषणात म्हटलं, "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे"
 
अत्र्यांच्या या घोषणेतील 'च' यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलून दाखवलं. तर त्यावर हजरजबाबी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आग्रही असलेले अत्रे म्हणाले, 'च'ला एवढं महत्त्व कशाला म्हणता? 'च' किती महत्त्वाचा असतो, हे तुम्हाला सांगायला हवं का? तुमच्या आडनावातला 'च' काढला, तर मागे काय राहतं 'व्हाण'!
 
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्या अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांना धारेवर धरलं खरं, पण 1962 साली जेव्हा यशवंतराव चव्हाणांना केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून बोलावण्यात आलं, तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणातून अत्रेंच्या मनाचा मोठपणा दिसून येतो.
अत्रेटोला या त्यांच्या पुस्तकात यशवंतरावांवरील त्या भाषणाचा समावेश आहे. त्यात ते म्हणाले होते, "पूर्वीच्या गोष्टी आता उगळीत बसण्याचे कारण नाही व मी त्या उगळीत नाही. आमदार यशवंतरावांच्या अंगी काही अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोहोचलेच नसते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे संरक्षणमंत्री म्हणून पाचारण केलेच नसते. यशवंतरावांचा स्वभाव, त्यांचे वागणे आणि त्यांचे बोलणे हे सारेच काही असे आहे की त्यांचे शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसालासुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नाही असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो."
 
हीच गत पंडित जवाहरलाल नेहरू यांची. त्यांच्यावरही अत्रेंनी टीका केली. अगदी 'जवाहरलाल की जहरलाल' इथवर ते बोलले. पण जेव्हा नेहरूंचं निधन झालं, तेव्हा सलग तेरा दिवस अत्र्यांनी मराठातून नेहरूंना श्रद्धांजली वाहणारे अग्रलेख लिहिले.
 
5) राजकारणातून रस घालवणारी निवडणूक
1962 साली आचार्य अत्रे पुण्यातून लोकसभेसाठी आणि मुंबईतून विधानसभेसाठी उभे होते.
 
पुण्यात अत्रेंच्या विरोधात शंकरराव मोरे हे काँग्रेसकडून, तर नानासाहेब गोरे हे समितीकडून उभे होते. याच सभेतल्या एका भाषणात अत्रे म्हणाले होते, "माझ्यासमोर एक आहेत शंकरराव मोरे, दुसरे आहेत नानासाहेब गोरे, या मोरे-गोरेंना मी गोरा-मोरा करतो की नाही बघा."
 
पण अत्रे पुण्यात लोकसभेला पडले. मात्र, मुंबईतून विधानसभेसाठी ते जिंकले. तत्कालीन मंत्री नरवणे यांचा त्यांनी मुंबईत विधानसभेला पराभव केला.
 
विधानसभेला जिंकलो, या आनंदापेक्षा पुण्यात हरलो याची खंत त्यांना कायम टोचत राहिली.
 
विजय तेंडुलकरांनी याबाबत 'हे सर्व कोठून येतं?' पुस्तकात सांगितलंय.
 
1962 ची निवडणूक अत्रेंच्या राजकीय अवसानाला लागलेला पहिला धक्का होता, असं तेंडुलकर म्हणतात.
 
अत्रे निकालाच्या दिवशी 'मराठा'च्या कार्यालयात आले. त्यांच्या केबिनमध्ये तेंडुलकर गेले, तेव्हा अत्रे एकच वाक्य सारखं बोलत होते, "खलास! सगळे खलास! मराठा कशाला? काय उरले आहे? सगळे घरी जा. व्हॉट्स देअर? व्हॉट्स देअर टू फाईट फॉर? काही नाही... नथिंग"
 
तेवढ्यात दादरमध्ये जिंकल्याचा संदेश घेऊन कुणीतरी तिथे आला, पण अत्रेंना आनंदच झाला नाही. पुण्यात पराभूत झाल्याचं त्यांना जिव्हारी लागलं होतं.
 
6) जेव्हा अत्रे विजय तेंडुलकरांवर ओरडले होते…
 
वक्तृत्वासोबतच लेखन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. शिवाय, हे लेखन अचूक आणि योग्य असण्याकडे त्यांचं नीट लक्ष असे.
 
अत्रेंचं लेखनाकडे किती बारकाईने लक्ष असेल, यासंदर्भात दिवंगत साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एक प्रसंग त्यांच्या 'हे सर्व कोठून येतं?' या पुस्तकात सांगितला आहे.
 
विजय तेंडुलकर हे सुरुवातीच्या काळात 'मराठा'मध्ये काम करत असत.
 
अत्रेंनी तेंडुलकरांना लेखनाबाबत झापलं खरं, पण त्यात ज्या सूचना केल्या, त्याबद्दल तेंडुलकरांनी मनातल्या मनात स्वत:ला धन्यही समजलं.
 
एका इंग्रजी लेखाचं भाषांतर करण्याची जबाबदारी तेंडुलकरांवर आली. भाषांतर झाल्यानंतर अत्रेंकडे सोपवण्यात आलं.
 
काही वेळानं पहिल्या मजल्यावरील अत्रेंच्या केबिनमधून खालच्या मजल्यावरील कार्यालयात इंटरकॉम दणाणला आणि समोरून विचारलं गेलं, "तेंडुलकर आहेत का तेंडुलकर? वर पाठवा त्यांना."
 
सूचनेबरहुकूम तेंडुलकर अत्रेंच्या केबिनमध्ये गेले.
 
अत्रे म्हणाले, "हे तुमचे भाषांतर. हे काय हे, सगळे चुकले आहे. अगदी चूक. ही काय वाक्ये. हे शब्दप्रयोग काय, हे कुणाला कळणार?"
 
तेंडुलकर सांगतात, एकेक लाल खूण केलेले उदाहरण घेऊन चूक पदरात घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता.
 
यापुढे अत्रेंनी तेंडुलकरांना जे सांगितलं, त्या लेखनासंबंधी मौलिक सूचना होत्या.
 
अत्रे म्हणाले, "भाषा कशी पाहिजे? सोपी पाहिजे. इव्हन अ चाईल्ड शुड फॉलो इट. म्हणजे भाषा. ती कळली पाहिजे. तर उपयोग! नाही तर हे. सोपे लिहीत चला. छोटी छोटी वाक्ये. सुंदर सुंदर साधे शब्द. सुंदर शब्द मराठीत पुष्कळ आहेत. गाथेत आहेत. आपल्या जुन्या बायका बोलतात. बहिणाबाई वाचा. असे शब्द जगात दुसऱ्या भाषेत नाहीत. तसे लिहिता आलं पाहिजे. जे कळत नाही ते बोंबलायला कशासाठी लिहायचे?"
 
तेंडुलकर म्हणतात, अत्रे ज्यावेळी हे सर्व ओरडून सांगत होते, त्यावेळी माझ्या पोटात खड्डा पडला होता.
 
पुढे विजय तेंडुलकरही साहित्य क्षेत्रात उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून गणले गेले. अत्रेंसारख्यांचा सहवास त्यांना लाभला, हेही त्यातलं एक कारण असू शकेल!
 
लिहिणं अत्रेंच्या कायमच जमेची बाजू राहिली. असाच एक लिहिण्यासंबंधीचा किस्सा मधुकर भावे यांनी लिहून ठेवलाय. विन्स्टन चर्चिल यांच्या निधनावेळीचा.
 
7) जेवणाचं ताट बाजूला ठेवून फोनवरून अग्रलेख सांगितला
24 जानेवारी 1965 ची गोष्ट. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे, असा गोवा विधानसभेने एकमताने ठरवा मंजूर केला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम पणजीच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला. हा सत्कार आचार्य अत्रेंच्या हस्ते ठेवण्यात आला.
 
सभेनंतर आचार्य अत्रे मांडवीतल्या हॉटेलता मुक्कामी आले. जेवायला बसणार इतक्यात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चील यांच्या निधनाची बातमी आली. त्यांनी भरल्या ताटाला नमस्कार केला आणि जेवण बाजूला ठेवलं.
 
अत्रेंच्या सोबत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे होते. अत्रेंनी भावेंना 'मराठा'च्या कार्यालयात फोन करायला सांगितला आणि फोनवरून संपूर्ण अग्रलेख सांगितला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जानेवारील 'मराठा'मध्ये आलेला 'सर विन्स्टन चर्चील' हाच तो अग्रलेख, जो पणजीहून फोनवरून सांगितला गेला होता.
 
असे होते अत्रे. अत्र्यांची शेवटची निवडणूक ठरली ती 1967 सालची. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेंनी हा किस्सा एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात सांगितला होता.
 
8) अत्रेंची शेवटची निवडणूक
1967 साली अत्रे मुंबईतून लोकसभेला पुन्हा उभे राहिले. आर बी भंडारेंच्या विरोधात. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे नेते स. का. पाटील यांच्याविरोधात जॉर्ज फर्नांडीस उभे होते.
 
स. का. पाटलांविरोधात फर्नांडीस यांच्यापेक्षाही आचार्य अत्रेंच्या जास्त सभा झाल्या होत्या.
 
मधुकर भावे सांगतात, "स. का. पाटलांना उद्देशून आचार्य अत्रेंच्या भाषणाची सुरुवात अशी असायची की, हा लेकाचा सदोबा, लोकसभेत जायला म्हणतोय, याला मी शोकसभेत पाठवेन."
 
याच प्रचारादरम्यान अत्रे म्हणायचे, "मी 13 ऑगस्टला जन्माला आलो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मधे एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले."
 
या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडीस 30 हजार मतांनी जिंकले. 'जायंट किलर' म्हणून त्यांची प्रतिमा रंगवली गेली.
 
मात्र, दुसरीकडे आचार्य अत्रे मात्र भंडारेंच्या विरोधात सहा हजार मतांनी पडले. त्यावेळी शिवसेनेनं आचार्य अत्रेंना मत न देण्याचं आवाहन केलं होतं.
 
निकालाच्या दिवशी एकानं बातमी आणली की, "अत्रेसाहेब तुम्ही निवडून आलात." त्यानंतर अत्रेंच्या पत्नीनं आरती तयार केली आणि अत्रेंना ओवाळायला पुढे आल्या. तेवढ्यात जीएल रेड्डी धावत आले आणि म्हणाले, "अहो काय करताय, आपण हरलोय."
 
तर अत्रेंच्या पत्नी म्हणाल्या, "ओवाळू की नको, काही खरं तरी सांगा." तर अत्रे म्हणाले, "अगं ओवाळ ओवाळ... स. का. पाटलांना मीच पाडलंय, जॉर्जनं थोडंच पाडलंय."
 
मात्र, 1967 च्या निवडणुकीनंतर अत्रे फारच थकले. 1962 च्या निवडणुकीनं त्यांचा हिरमोड केलाच होता, पण या निवडणुकीनं रसच घालवला.
 
या निवडणुकीच्या दोन वर्षांनी 13 जून 1969 रोजी अत्रेंचं निधन झालं.
 
अत्रेंच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जून 1969 रोजी गोविंद तळवकर यांनी अग्रलेख लिहिला होता, त्यात त्यांनी म्हटलं होतं, "महाराष्ट्राच्या दगडा-धोंड्यांवर, नद्या-डोंगरांवर अतोनात प्रेम करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या निधनाने पहाडाचा कडा कोसळला, असेच म्हणावे लागेल."

Published By- Dhanashri Naik