संघर्ष सुरू होता तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंचा राज यांना टोला
राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भुमिकेमुळे अयोध्या (Ayodhya) पुन्हा एकदा चर्चेत आहे. आधी भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा, महाआरती आणि नंतर अयोध्या दौऱ्याची घोषणा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत. राज ठाकरेंनी येत्या 5 जुनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली असून, त्यासाठी मनसैनिकांनी तयारी सुरु केली आहे. त्यानंतर आता पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर खरपुस प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंनी या विषयावर बोलताना सांगितलं की, संपलेल्या विषयावर मी बोलत नाही. नांदेडमधील पावडेवाडी येथे होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अदित्य ठाकरे आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, संपलेल्या विषयावर मी बोलत नाही. जेव्हा संघर्ष सुरू होता तेव्हा आम्ही जात होतो. आता संघर्ष संपलाय आता आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचं अदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा या विषयावरुन राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा सोडून आता हिंदुत्वादाची भूमिका स्विकारली असून, त्यांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे राज्यातील वातावरण सुरुवातीला चांगलंच ढवळून निघालं होतं. मात्र, आता राज ठाकरेंच्याच अचणीत वाढ होताना दिसतेय. कारण उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृज भुषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरेंना माफी अन्यथा अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. बृज भुषण सिंह यांनी आता राज ठाकरेंना मोठं आव्हान दिलं असून, माफी मागितल्या शिवाय पाय देखील ठेवू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
बृज भुषण सिंह यांनीही राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या संत सम्मेलनातून त्यांनी राज ठाकरेंना आणखी एक संधी देतोय असं म्हणत राज ठाकरेंना उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागायची नसेल तर त्यांनी संत समाजाची माफी मागावी असं आवाहन केलं आहे. जर राज ठाकरेंनी माफी मागायची नसेल तर त्यांनी आयुष्यात कधीही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये पाय ठेवण्याचा विचार करु नये. त्यांनी केलेलं पाप त्यांच्या नेहमी लक्षात येईल असं बृजभुषण सिंह म्हणाले. अयोध्येतील संत समाजानेही राज ठाकरेंविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर "छटी का दुध याद दिलाएंगे, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील मे है" असं म्हणत साधुंनी सुद्धा राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.