गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (18:29 IST)

उद्धव ठाकरें विरोधात लढण्यासाठी एकनाथ शिंदे राज ठाकरेंची साथ घेणार का?

raj thackeray shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणपती दर्शनाच्या निमित्ताने अनेक राजकीय भेटीगाठी करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भेटींपैकी राज ठाकरे, मनोहर जोशी, मुकेश अंबानी आणि उध्दव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
 
देशाचे गृहमंत्री अमित शहा हे 4 आणि 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वर्षा बंगल्यावर ते भविष्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत. आगामी निवडणुकांसाठी गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
 
या भेटींमागचा उद्देश काय? शहांचा मुंबई दौरा आणि शिंदेंची गणपती दर्शनाच्या निमित्ताने सुरू असलेली राजकीय मोर्चेबांधणी उद्धव ठाकरेंसाठी आगामी निवडणुकीत अडचणीची ठरू शकेल का? याबाबतचा हा आढावा..
 
अमित शाह यांचा दौरा कसा आहे?
देशाचे गृहमंत्री अमित शाह हे 4 सप्टेंबर रात्री मुंबईत दाखल होतील. मलबार हिलच्या सह्याद्री अतिथीगृहावर रात्री मुक्काम करतील. 5 सप्टेंबरला सकाळी साधारण 10.30 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. त्यानंतर वांद्रे पश्चिम इथे सार्वजनिक गणेश मंडळात ते पूजा करतील. त्यांच्या या धार्मिक कार्यक्रमानंतर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ते बैठका घेतील.
 
साधारण 2.15 च्या सुमारास अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अमित शहा यांनी अर्ध्या तासाचा वेळ राखीव ठेवला आहे.
 
या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले, " अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्याचबरोबर राज्यात आता भाजप आणि शिवसेनेची युती आहे. हे सरकार स्थापन होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे निश्चित आमची भेट होईल. राज्य सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार हे खंबीरपणे उभे आहे हे वारंवार सांगतात. त्या अनुषंगाने भेट होईल. " अमित शहांच्या दौऱ्यात या भेटीचा उद्देश गुप्त असल्याचं नमूद करण्यात आले आहे.
 
शहांच्या दौऱ्याआधी शिंदेंच्या राजकीय भेटी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांच्या घरी उपस्थितीती लावली. एकनाथ शिंदे हे 1 सप्टेंबरला सकाळी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी दर्शनासाठी गेले. त्यानंतर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. शिवसेनेत असताना इतकी वर्षे एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरे यांच्याशी तितकासा संपर्क दिसला नाही.
पण शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर एकनाथ शिंदे यांचं राज ठाकरेंशी फोनवर बोलणं झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शिवतीर्थावर पोहचले. गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट ही राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जातेय.
 
शिंदे-ठाकरे वाद हा न्यायप्रविष्ट आहे. जर शिंदे गटाला स्वतंत्र गटाची मान्यता न मिळता, कुठल्याही पक्षात विलीन होण्याचा पर्याय शोधावा लागला तर तो पर्याय मनसे असू शकेल का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता.
 
त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते, "माझ्याकडे सध्या असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर असा प्रस्ताव आला तर मी निश्चितपणे याचा विचार करेन." यादृष्टीनेही या भेटीकडे पाहिलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, "राज ठाकरे यांची मी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हाच मी भेटीसाठी येणार होतो. आता गणपतीचं निमित्त आहे. या भेटीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं. पण ही भेट राजकीय नव्हती. त्यामुळे भविष्यातली राजकीय समीकरणं वगैरे असं काही नाहीये. "
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व ठाण्यामध्ये आहे. मुंबईमध्ये मराठी माणसांची मतं मिळवायची असतील तर आता भाजपला आणि एकनाथ शिंदेंना ठाकरे ब्रँडची गरज आहे. ठाकरे ब्रँडची ती जागा राज ठाकरेंची मनसे भरून काढू शकत असेल तर कदाचित आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंसोबत नवी राजकीय समीकरण दिसू शकतात. यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे प्रयत्न करू शकतो. "
 
मनोहर जोशी, मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीगाठी या व्यक्तिगत संबंधामधून घेतल्या आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
 
उद्धव ठाकरेंसाठी नवी राजकीय समीकरणं कठीण जाऊ शकतील का?
 
मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यात जाहीर होऊ शकते. यावेळी मातोश्रीवर बैठका पार पडत आहेत. आदित्य ठाकरे राज्यभर दौरा करतायेत. पण कितीही ताकद लावली तरी शिवसेनेतून बाहेर पडून 40 आमदारांनी केलेलं बंड, उध्दव ठाकरेंची नाजूक तब्येत आणि भविष्यात मुंबई महापालिका-महाराष्ट्र ताब्यात ठेवण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची महत्वाकांक्षा हे उध्दव ठाकरेंसाठी कठीण जाणार आहे का? हा प्रश्न येतो.
भविष्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी बघायला मिळाली तर शिवसेनेचे काय होणार? याबाबत बोलताना, लोकमतचे सहायक संपादक संदिप प्रधान सांगतात, "उध्दव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी आडकाठी केली जात आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंशी सूत जुळवून ठाकरे ब्रँडचा वापर भाजप आणि शिंदे करू पाहत आहेत असं दिसतंय. यासगळ्याचे दोन परिणाम होऊ शकतात. एकतर शिवसेनेचे खच्चीकरण होऊ शकतं किंवा तीन पक्ष मिळून उद्धव ठाकरेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं चित्र उभं राहिल्यावर लोकांमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहानुभूती मिळू शकते. आगामी निवडणुकीत कशा घडना घडतात यावर हे परिणाम अवलंबून आहेत. त्यामुळे हे मतपेटीतूनच समोर येईल. "
 
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "उध्दव ठाकरेंसाठी आगामी निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण शिवसेनेचं राजकीय भवितव्य हे या निवडणुकीवर अवलंबून आहे. उध्दव ठाकरेंनी युती तोडून भाजपला सत्तेतून बाहेर ठेवलं. या द्वेषाने भाजप या निवडणुकीत उतरली आहे. त्यांच्यासोबत शिंदे गटाची ताकद आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात राज ठाकरेंची मदत भाजप आणि शिंदे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच उध्दव ठाकरेंसाठी ही निवडणूक आणि नवी राजकीय समीकरणं ही कठीण जाऊ शकतात. निवडणूक चिन्हावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरेही आपली पूर्ण शक्ती यात पणाला लावतील. पण त्यांच्याकडे नेत्यांचं संख्याबळ कमी आहे हे सत्य आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कसं कसे कार्यकर्ते जोडतात आणि या बंडाचा राजकीय कसा फायदा करून घेतात हे निवडणुकीतच कळेल."