शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:15 IST)

पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या कामाचे नियोजन करणार : मनपा आयुक्त

शासकीय योजनांमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीडीसी, शंभर कोटीसह मिळेल त्याठिकाणाहून निधी उपलब्ध करीत पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या कामाचे नियोजन करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी उपस्थित होते. पुढे बोलतांना आयुक्त कुलकर्णी म्हणाले की, शहरात अमृत व भुयारी गटारी या दोन मोठ्या शासकीय योजनांचे काम सुरु असल्याने संपुर्ण शहरातील रस्ते खोदण्यात आले आहे. मात्र ज्याठिकाणी दोन्ही योजनांचे कामाची चाचणी घेवून ते पुर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याठिकाणावरील रस्ते दुरुस्तीचे काम केले जात आहे. या दोन्ही योजनांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे काम पुर्ण होणार आहे. त्यापुर्वी जिल्हा नियोजन समिती, शंभर कोटीसह महापालिकेला मिळेल तो निधी एकत्रीत करुन शहरातील रस्त्यांच्या कामाचे नियोजन केले जाणार असल्याचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.
 
शहरात राजकीयसह अनेक संस्थांकडून विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावले जात आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बॅनर लावणार्‍यांवर शनिवार पासून कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.
 
महापालिका प्रशासनाकडून शहरात अनधिकृत बॅनर लावणार्‍यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच अधिकार्‍यांनी तक्रार दिल्यानंतर बॅनरवरील शुभेच्छकांसह ते लावणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत बॅनर लावणार्‍यांनी मनपा प्रशासनाची परवानगी घेवूनच बॅनर लावण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.