शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 5 जुलै 2021 (08:53 IST)

एमपीएससी परीक्षेसंदर्भात समिती स्थापन करणार; लोणकर आत्महत्या प्रकरणानंतर सरकार सतर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुण्यातील तरुण स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केलीय. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनंही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. अशावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तसंच एमपीएससी परीक्षेबाबत एक समिती गठीत केली जाणार असल्याचं कळतंय.
 
स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकार चांगलंच अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सरकारच्या नाकर्तेपणामुळेच स्वप्निलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वप्निलच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आली. एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार एक समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती आता मिळतेय.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना २९ जून रोजी घडली.
 
सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुलं हा घरच्यांसाठी आधार असतो. पण अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी काय करायचं? आम्ही तर म्हणू की सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय,असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय.
 
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न एक महिन्यात सोडवू : वडेट्टीवार
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केलीय. त्यावरुन भाजप नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. अशावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न एका महिन्यात सोडवण्याचं आश्वासन वडेट्टीवार यांनी दिलंय.
 
पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि दु:खद आहे. मी त्याच्या वडिलांशी बोललो.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलणार आहोत. राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने लावून धरु आणि एका महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवू असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिलंय.