गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (08:43 IST)

प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेच्या गोळ्या देऊन केला खून

विवाहबाह्य संबंधाला अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने सिव्हील इंजिनिअर असलेल्या पतीला झोपेच्या गोळ्या देऊन नंतर त्याचा खून केल्याचा प्रकार उरूळी कांचन येथे घडला. लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे हा प्रकार उघडकीस आला. पत्नीसह तिच्‍या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अश्विनी मनोहर हांडे (१९, रा. उरूळी देवाची) आणि गौरव मंगेश सुतार (रा. उत्तमनगर, फुरसुंगी) अशी संशयित आराेपींची नावे आहेत.  मनोहर हांडे (२७, रा. उरूळी देवाची) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीचे आणि गौरवचे सातवीपासूनचे प्रेमसंबंध होते. बारावीपर्यंत दोघे एकत्र शिकत होते. याचदरम्यान तिच्या घरच्यांनी तिचा विवाह  मामाचा मुलगा असलेल्या मनोहर हांडे याच्याशी जानेवारी २०२१ मध्ये केला. मनोहर सिव्हील इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. विवाहानंतरही अश्विनीचे गौरवबराेबरील प्रेमसंबध संबंध सुरूच राहिले.
 
मनोहर गुन्हा घडण्यापूर्वीच्या १५ दिवसांपासून कोरोना पॉझीटिव्ह असल्याने घरीच उपचार घेत होता. या काळात गौरवबरोबर असलेल्या संबंधाच्या कारणावरूनच पती-पत्नीमध्ये जोरदार भांडणे झाली. गौरवने अश्विनीला झोपेच्या गोळ्या नेऊन दिल्या. तिने सुरुवातील चहातून मनोहरला गोळ्या दिल्‍या. मात्र त्याच्यावर गोळ्यांचा परिणाम झाला नाही. म्हणून २३ मे रोजी गौरवने अश्विनीला पुन्हा झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. त्या गोळ्या तिने मनोहरला दुधातून दिल्या. 
 
मनोहर झोपी गेल्यानंतर मध्यरात्री गौरव त्यांच्या घरी आला. अश्विनी व त्‍याने मिळून मनोहरचा तोंड व गळा दाबून खून केला. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौरव निघून गेला. सकाळी वरील मजल्यावर राहणारी मनोहरची आई आली. यावेळी अश्विनीने मनोहर कारोनामुळे निधन झाले असल्याचे सांगितले. पाेलिसांकडूनही  सुरूवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.गौरव आणि अश्विनी या दोघांनी मनाेहरचा खून करून झोपेच्या गोळ्याचे पाकीट व इतर पुरावे नष्ट केले. मनोहरचा मृत्यू हा कोरोनानेच झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.