होय, नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच उमेश कोल्हे यांची हत्या
अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतील या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला.
पोलीस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले, “उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालं आहे. एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.”
“नुपूर शर्मांच्या पोस्ट ज्यांनी लाईक केल्या, कमेंट केल्या, फॉरवर्ड केल्या त्या सर्वांना धमक्या आल्या आहेत. माफी मागा म्हणून या धमक्या आल्या आहेत. उमेश कोल्हे यांचे मी जे स्क्रिनशॉट पाहिले त्यातही असाच प्रकार आढळून आला. त्यामुळे या खूनाशी त्या गोष्टीचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं होतं.