शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (21:21 IST)

येवला शहर पोलिसांनी रस्ता लूट करणाऱ्या आतंरराज्यीय टोळीस केले गजाआड

jail
येवला शहर पोलिसांनी रस्ता लूट करणाऱ्या आतंरराज्यीय टोळीस अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यातून घेऊन गजाआड केले आहे. आकाश प्रकाश इंद्रेकर, सन्नी सुरेशभाई भादरभाई तमंचे, अजय अशोकभाई जाक्सीभाई तमंचे, सुशांत ऊर्फ विक्की, विनुभाई इद्रेकर, विकास ऊर्फ ठाकुर छगनभाई, रणछोड़भाई भोगेकर असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील चोरांचे नाव आहे. या चोरांनी गुन्हयात वापरलेले वाहन, मोबाईल जप्त केले आहे.
 
या आरोपींनी गेल्या महिन्यात तालुक्यातील अंदरसूल येथील कांदा व्यापारी सुनिल नंदलाल अट्टल यांचे कडील कॅशिअर विजय नानासाहेब गायकवाड व राहुल उगले हे कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेतून ७ लाख २५ हजार काढून आणले होते. त्यानंतर ते कोटमगांव रोडने अंदरसूलकडे ज्यूपिटर मोटर सायकलने जात असताना मागून दुचाकीवर या टोळीतील दोन जण आले. त्यांनी राहुल उगले याचे हातातील जेवणाचा डबा असलेली पिशवीत पैसे आहे असे समजून ती ओढून भरधाव वेगाने तेथून निघून गेले. त्यात गायकवाड यांचा तोल गेल्या त्यामुळे त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली. त्यात त्यांचा मृत्यू झाला तर राहुल उगले हे जखमी झाले.
 
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने येवला शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे सुचनांप्रमाणे गुन्हयाचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी कोपरगांव पिपल्स को. ऑप. बँक, शाखा येवला येथील डाटा स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांची मदतीने घेवून संशयीताचे मोबाईल नंबर ट्रेस करून त्याबाबत अहमदाबाद पोलीस यांचेशी संपर्क साधुन सीसीटिव्ही फुटेज पाठवुन माहीती प्राप्त केली असता, सदर गुन्हयातील आरोपित हे अहमदाबाद  येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना क्राईम ब्रॅन्च अहमदाबाद यांनी ताब्यात घेवून येवला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.