मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (20:48 IST)

योगेश घोलप यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

sharad panwar
नाशिकच्या देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते योगेश घोलप यांनी सोमवारी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान ही केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिली.
 
गेल्या आठ दिवसापासून शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाच्या पक्ष श्रेष्ठींनी स्वीकारला नसला तरी त्यांना वेट अँड वॉच ठेवले आहे.
 
त्याचप्रमाणे त्यांना चर्चेसाठी मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्वतः घोलप सुद्धा याबाबत नाराज आहेत.  मात्र घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे घोलप यांच्या समर्थनार्थ  रविवारी  छत्रपती शिवाजी पार्क मुंबई दादर येथे चर्मकार समाजाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
 
तर दुसरीकडे बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान या संदर्भात योगेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहे. त्यामुळे आपण त्यांचे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले असे योगेश घोलप यांनी सांगितले.