शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (20:55 IST)

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारतीय संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला आणि २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 
भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती.
 
भारताला १५ ऑगस्टला स्वतंत्र मिळाले असले तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.
 
२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. इतर दोन सुट्टया स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर) रोजी असतात.